पुणे- येत्या बुधवारी( 4 तारीख) पुण्यात होऊ घातलेल्या मुस्लिम आरक्षण परिषदेला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. या आरक्षण परिषदेला एमआयएमचे खासदार असावुद्दीन ओवेसी हे हजर राहणार होते. ओवेसी हे धार्मिक व वादग्रस्त वक्तव्य करण्यास पटाईत असल्याने शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख विनायक निम्हण यांनी ओवेसींच्या भाषणाला व सभेला विरोध केला होता. तसेच या सभेत हिंदूंविरोधात अपशब्द काढल्यास सभा उधळून लावण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.
पुण्यासह महाराष्ट्रातील धार्मिक ऐक्याला धक्का लागू नये, सामाजिक सलोखा बिघडू नये, या उद्देशानं वानवडी पोलिसांनी एमआयएमचे प्रमुख नेते असदुद्दीन ओवेसींच्या सभेला, मुस्लिम आरक्षण परिषदेला परवानगी नाकारली आहे. प्रक्षोभक, विखारी भाषणं करणाऱ्या ओवेसींनी हिंदू धर्माविरोधात चकारही काढल्यास त्यांची सभा उधण्याचा इशारा शिवसेनेनं दिल्यानंतर पोलिसांनी हा सावध पवित्रा घेतला आहे.
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमिन (एमआयएम) पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी हे ४ फेब्रुवारीला पुण्यात येणार होते. महाराष्ट्र कृती समिती आणि मूलनिवासी मुस्लिम मंचानं गोळीबार मैदानावर मुस्लिम आरक्षण परिषदेचं आयोजन केलं होतं आणि तिथे ओवेसींचं भाषण होणार होतं. आपल्या चिथावणीखोर वक्तव्यांसाठी, हिंदूविरोधी भाषणांसाठी ते ओळखले जात असल्यानं ही परिषद वादळी ठरू शकत होती. शिवसेनेनं शनिवारी ओवेसींना धमकावून तशी चा’हूल’ही दिली होती.
बुधवारी पुण्यात होणाऱ्या एमआयएमच्या सभेवरुन उद्धव ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पुण्यातील या सभेत हिंदूंविरोधात अपशब्द काढल्यास सभा उधळून लावा, असे आदेश उद्धव ठाकरेंनी शिवसेना नेत्यांना एका बैठकीत दिल्याचे समजते आहे. असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाचे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत दोन आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे आत्मविश्वास वाढलेल्या एमआयएमने महाराष्ट्रातील राजकारणात आपले पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. विशेषत: मराठवाड्यात एमआयएमने ब-यापैकी लक्ष केंद्रित केले आहे. एमआयएमने आता आपला मोर्चा पुण्याकडे वळल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे. हिंदू जनतेच्या भावना दुखावतील, असं जळजळीत मत ओवेसी मांडू शकतात. तसं झाल्यास आम्ही ते सहन करणार नाही. त्यांची आरक्षण परिषद आम्ही उधळून लावू आणि त्याला सर्वस्वी आयोजक जबाबदार असतील. त्यामुळे पोलिसांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं खरमरीत निवेदन शिवसेना पुणे शहरप्रमुख विनायक निम्हण यांनी पोलीस आयुक्त सतीश माथूर यांना दिलं होतं. त्यावर, आरक्षणाचा विषय सामाजिक आहे, धार्मिक तेढ निर्माण करायचा आमचा उद्देश नाही, ओवेसींशिवायही अनेक मान्यवर या परिषदेत भाषणं करणार आहेत, असं सांगून आयोजकांनी सारवासारव करायचा प्रयत्न केला होता. परंतु, ओवेसींच्या भाषणामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, सामाजिक सलोखा बिघडू शकतो, असं नमूद करत वानवडी पोलिसांनी मुस्लिम आरक्षण परिषदेलाच परवानगी नाकारली आहे. हा ओवेसींसाठी मोठा झटकाच आहे. त्यांच्यावर पोलिसांचा विश्वास नसल्याचंच या निर्णयातून स्पष्ट होत असून त्यांच्या विखारी मनोवृत्तीलाच ही चपराक असल्याचं मानलं जातंय.