मुंबई- शिवसेना हा राजकीय शत्रू नसल्याचे भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा म्हटले आहे दरम्यान भारतीय जनता पक्षाला या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळणार असून, कोणाच्याही पाठिंब्याची आम्हाला गरज भासणार नाही असे भाजपचे दोन्ही विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे व विनोद तावडे यांनी म्हटले आहे. मुंबईत ते पत्रकार परिषदेत बोलत होते. पत्रकारांनी विचारले असता खडसे व तावडेंनी राष्ट्रवादीचा पाठिंबा कोणत्याही स्थितीत घेणार नसल्याचे स्पष्ट केले. आम्हाला बहुमत मिळणार आहेच पण कदाचित नाही मिळाले तर आम्ही राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार नसल्याचे सांगितले.
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला चांगले यश मिळेल तसेच महाराष्ट्रातील येऊ घातलेले नवे सरकार बनविण्यात आमची प्रमुख भूमिका असेल असे पटेल यांनी म्हटले होते. त्यामुळे राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार का याची चर्चा सुरु झाली होती. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनीही बुधवारी वाहिन्यांवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा कोणत्याही स्थितीत घेणार नसल्याचे स्पष्ट केले होते. पंतप्रधान मोदींनीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भ्रष्टाचारवादी असल्याचे स्पष्ट केल्याने त्यांची साथ घेण्याचा प्रश्नच येत नाही. आम्हाला कोणत्याही पक्षाची गरज भासणार नाही. आम्ही स्वबळावर सत्तेत येऊ व स्पष्ट बहुमत मिळवू असे फडणवीस यांनी स्पष्ट केले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसनेही भाजपसोबत कधीही जाणार नाही असे वारंवार स्पष्ट केले आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीही भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच येत नसल्याचे म्हटले आहे. मात्र, तरीही भाजप-राष्ट्रवादीत युती होईल अशी चर्चा माध्यमांत सतत केली जात आहे. राष्ट्रवादी आणि भाजपची विचारधारा पाहता हे दोन पक्ष एकत्र येतील अशी बिलकूल शक्यता नाही. या दोघांनाही एकमेंकाची सोबत परवडणारी नाही. त्यामुळे राष्ट्रवादी एक तर काँग्रेससोबत जाऊ शकतो अन्यथा शिवसेनेसोबत. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीकडे तेवढे संख्याबळ नसेल असे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे शिवसेनेला 80 पेक्षा जास्त व राष्ट्रवादीला 60 पेक्षा जास्त मिळाल्यास या दोघांची एकत्र येण्याची शक्यता जास्त आहे.