मुंबई- भगवत गीता ज्यांना तोंडपाठ होती , भगवत गीतेचे श्लोक आणि उत्तुंग म्हणता येईल असा वक्ता; ज्याने सुरुवातीच्या काळातच शिवसेना ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्याचे सामर्थ्यवान काम केले ते , शिवसेनेचे नेते व माजी कामगारमंत्री साबीर शेख यांचे आज दुपारी ठाण्याजवळील कल्याणच्या कोणगावात राहत्या घरी निधन झाले. साबीर शेख मागील तीन-चार वर्षापासून आजारी होते.शिवसेना हि मुस्लिम आणि दलित विरोधी नाही तर ती देशद्रोही मुस्लिम आणि तमाम देशद्रोह्यांच्या विरोधात डरकाळी फोडणारी संघटना आहे असा यशस्वी प्रचार करून १९७५ ते १९८५ या दशकात शिवसेना महाराष्ट्रभर पोहोचविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता . पुण्याशी आणि अहमदनगर जिल्हयाशी त्यांची फारच जवळीक होती . ते मूळ पुणे जिल्ह्यातील रहिवासी होत
1995 मध्ये महाराष्ट्रात प्रथमच सत्तेत आलेल्या शिवसेना-भाजपच्या युतीच्या काळात शेख कामगार मंत्री होते. साबीर शेख शिवसेनेचा मुस्लिम चेहरा होते. बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून साबीर शेख यांची ओळख होती. साबीर शेख यांचे पुतणे अराफत शेख यांनी मनसेतून नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे.
शिवसेनेचे लढवय्ये नेते आणि माजी कामगार मंत्री साबीरभाई शेख गेल्या तीन-चार वर्षापासून आजारी होते. पत्नीच्या निधनानंतर साबीर भाई एकटे पडले होते. एकुलती एक मुलगी आहे पण तिचे लग्न झाल्याने ती सासरी असते. त्यामुळे भाईंना पुतण्याशिवाय व शिवसैनिकांशिवाय आधार नव्हता. त्यामुळे त्यांची काळजी घेण्यासाठी कोणीही नसल्याने मध्यंतरी त्यांना औरंगाबादच्या कल्पतरू युवाविकास मंचने औरंगाबाद येथील मातोश्री वृद्धाश्रमात हलवले होते. त्यांची काळजी कल्पतरू मंचने घेतली होती. मात्र शेख लगेच कल्याणमध्ये परतले होते. माझे शिवसैनिक माझी काळजी घेतील असे शेख यांनी त्यावेळी म्हटले होते.
आयुष्यभर शिवसेनेसाठी लढणा-या साबीरभाईंना उतारवयात मधुमेहाने त्रस्त केले होते. शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून साबीरभाईंनी शिवसेना उभारणीसाठी जीवाचे रान केले. उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा आजार असल्याने तीन-चार वर्षापासून ते अंथरूणाला खिळून होते. कल्याणजवळील कोनगावात सध्या पुतण्या अराफतकडे ते राहत होते. प्रकृतीकडे विशेष लक्ष देण्यासाठी कोणी नसल्याने त्यांची प्रकृती खूपच खालावली होती.ज्ञानेश्वरीचे भाष्यकार, कीर्तन व प्रवचनात रमणारे, सह्याद्रीभ्रमण भूषणकार अशी अनेक बिरूदे साबीरभाईंना मिळाली होती. अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार म्हणून ते निवडून आले. 1995 मध्ये शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात बाळासाहेबांनी साबीरभाईंना कामगार खात्याचे मंत्री केले. बाळासाहेबांनी साबीरभाईंना ‘शिवभक्त’ ही पदवी दिली होती