Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित …

Date:

IMG-20150819-WA0010 Maharashtra_Bhushan_6 Maharashtra_Bhushan_11 Maharashtra_Bhushan_12

मुंबई : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी सगळ्यांना अभिमान वाटावे असे महान कार्य मागील 75 वर्षे केले असून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देशातच नव्हे तर जगभर पोहोचविला आहे. श्री. पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळणे हा एक गौरवाचा क्षण असून महाराष्ट्र भूषण पुरस्कारामध्ये बाबासाहेब पुरंदरे यांचे नाव जोडले गेल्याने या सन्मानाचे महत्व अधिकच वाढले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कार्याचा गौरव केला.

सन 2015 या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना बुधवारी राजभवन येथील दरबार हॉल येथे विशेष समारंभात राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी मुंबई शहराचे पालकमंत्री सुभाष देसाई, महापौर स्नेहल आंबेकर, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर, महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर, सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अरविंद सावंत, खासदार संजय राऊत, सर्वश्री आमदार मंगलप्रभात लोढा, आमदार महादेव जानकर, ॲड. आशिष शेलार, डॉ. नीलम गोऱ्हे, प्रताप सरनाईक यांच्यासह महाराष्ट्र भूषण मंगेश पाडगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

याच कार्यक्रमादरम्यान मान्यवर कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवन प्रवास काही पोवाड्यातून सादर केला.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करुन आपल्या भाषणाची सुरुवात करणारे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, राजभवन येथे महाराष्ट्र भूषण कार्यक्रम का करण्यात आला असा सवाल उपस्थित केला जातो आहे. मला यानिमित्ताने सांगावेसे वाटते की, नवी दिल्ली येथे देशाचे सर्वोच्च नागरी सन्मान हे राष्ट्रपती भवनातील कार्यक्रमात प्रदान करण्याची परंपरा आहे आणि म्हणूनच महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी सन्मान राज्यपाल भवन म्हणजेच राजभवन येथे राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेले कार्य शिवचरित्र आणि जाणता राजाच्या माध्यमातून श्री. पुरंदरे यांनी सर्वदूर पोहोचविले आहे. महाराष्ट्रातील तरुणांमध्ये राष्ट्रप्रेमाचे बीजारोपण त्यांनी याद्वारे केले आहे. जाणता राजा आणि शिवचरित्र वाचले की, तरुणांना राष्ट्रभक्ती शिकविण्याची गरज उरत नाही असे मला वाटते. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या सेवकाला राज्य शासनामार्फत सन्मानित करण्यात आले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

छत्रपतींवरील सिनेमा, मालिकेस आर्थिक पाठबळ
मुख्यमंत्री म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे अनेक नेतृत्व गुण होते तसेच ते काळाच्या पुढे जाऊन विचार करीत. हिंदवी स्वराज्य स्थापन केल्यानंतर त्यांनी राज्य कारभार कसा करावा याचे आदर्श धडे दिले आहेत. माझ्या मते आजच्या भाषेत बोलायचे झाले तर छत्रपती शिवाजी महाराज हे मॅनेजमेंट गुरु होते. त्यांनी दाखविलेली समयसूचकता, नियोजन, प्रशासकीय कौशल्य, व्यवस्थापन शास्त्र शिकण्यासारखे आहे. आजच्या तरुण पिढीला छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेले कार्य कळावे यासाठी त्यांच्यावर आधारित सिनेमा किंवा मालिका केल्यास त्याला राज्य शासनामार्फत आर्थिक पाठबळ दिले जाईल, असेही त्यांनी जाहीर केले.
महाराष्ट्राला छत्रपती समजले ते बाबासाहेबांमुळे- विनोद तावडे
या कार्यक्रमात प्रास्ताविक करताना सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. तावडे म्हणाले, महाराष्ट्रात असे अनेक लोक आहेत ज्यांना कधी विचारले की तुम्हाला शिवाजी महाराजांची माहिती कशी मिळाली तर त्यांच्याकडून येणारे उत्तरे हे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखनातूनच मिळाली, असे असते. यावरून बाबासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा केलेला गाढा अभ्यास दिसून येतो. यावर्षी हा कार्यक्रम अधिक चर्चिला गेला. पण आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगू इच्छितो की, बाबासाहेब पुरंदरे यांना शिवशाहीर ही पदवी सुमित्रा राजेंनी दिली होती. ही पदवी बाबासाहेबांना किती योग्य आणि समर्पक आहे, हे त्यांनी आपल्या कार्यातून महाराष्ट्राला दाखवून दिले आहे. आज या निमित्ताने सांगू इच्छितो की, आपण 10 कोटी रुपये खर्च करुन रायगड महोत्सवाचे आयोजन करीत आहोत. आजच्या पिढीला शिवकालीन इतिहास समजावा, हाच यामागचा उद्देश आहे. आज उच्च न्यायालयानेही बाबासाहेबांच्या कार्याचा सन्मान केला असून त्यांनी इतक्या वर्षांत केलेल्या कार्याचा गौरवच केला आहे, असेही श्री. तावडे म्हणाले.
बाबासाहेबांनी लिहिलेले शिवचरित्र वाचून चार पिढ्या समृद्ध झाल्या- सुभाष देसाई

मुंबईचे पालकमंत्री श्री. देसाई आपल्या भाषणात म्हणाले, आज शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. या आनंदाच्या क्षणाचा मला साक्षीदार होण्याची संधी मिळाली, याचे मी भाग्य समजतो. बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिल्याने महाराष्ट्र भूषण ही मालिका अधिकच समृद्ध झाली आहे, असे मी म्हणेन. बाबासाहेबांनी लिहिलेले शिवचरित्र वाचून आणि ऐकून 4 पिढ्या समृद्ध झाल्या आहेत. त्यामुळे बाबासाहेबांच्या कार्याची महती परत परत सांगण्याची गरज नाही. यावेळी श्री. देसाई यांनी आपल्या भाषणात एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, एक दिवस शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मला फोन आला आणि फोनवरुन त्यांनी मला चित्रकार वासुदेव कामत यांना त्यांच्या चित्र काढण्यासाठी आवश्यक असलेल्या सामग्रीसह मातोश्रीवर घेऊन येण्याच्या सूचना दिल्या. मी वासुदेव कामत यांना घेऊन मातोश्रीवर पोहोचलो असता तेथे बाबासाहेब पुरंदरे बाळासाहेबांबरोबर बसलेले होते. तेथे त्यांनी वासुदेव कामत यांना बाबासाहेब यांचे चित्र काढण्यास सांगितले. त्या दिवशी श्री. कामत यांनी ते चित्र काढल्यावर बाळासाहेबांनी स्वत: ते चित्र बाबासाहेबांना भेट दिले होते. आज जर शिवसेनाप्रमुख हयात असते तर ते नक्कीच श्री. पुरंदरे यांच्या सत्काराला राजभवन येथे उपस्थित राहिले असते. याच कार्यक्रमादरम्यान श्री. देसाई यांनी श्री. पुरंदरे यांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतनही केले.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे मनोगतात म्हणाले, मला आज आनंद आहे की मी सोप्या आणि सरळ भाषेत केलेले लेखन सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले आहे. कलाकाराने कधीही अहंकारी असू नये आणि सतत नवीन काहीतरी शिकण्याची तयारी ठेवावी आणि म्हणूनच आज मी जरी 94 वर्षांचा असलो तरी मला दररोज काहीतरी वाचावे, लेखन करावे असे सतत वाटत असते. राज्य शासनामार्फत देण्यात आलेला महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार ही माझ्यासाठी आनंदाची आणि तितकीच जबाबदारीची बाब आहे. गेली 80 वर्षे करीत असलेले कार्य यापुढील काळातही सुरू ठेवून माझ्याकडून अधिकाधिक चांगले लेखन व्हावे यासाठी माझा प्रयत्न असणार आहे. आज राज्य शासनामार्फत महाराष्ट्र भूषण या पुरस्काराबरोबरच 10 लाख रुपये मला रोख देण्यात आले असले तरी मी हे पैसे न घेता या पैशामध्ये माझे स्वत:चे 15 लाख रुपये घालून एकूण 25 लाख रुपये पुण्यातील मास्टर दिनानाथ आणि माई मंगेशकर रुग्णालयाला कॅन्सर रुग्णांच्या मदतीसाठी देणार आहे.

या पुरस्काराचे स्वरुप 10 लाख रूपये रोख, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे आहे. कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्या व्यक्तीला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गठित तज्ज्ञांच्या समितीने सन 2015 च्या या पुरस्कारासाठी बळवंत मोरेश्वर ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे यांची निवड केली होती. बाबासाहेब गेली 70 वर्षे शिवचरित्रावर व्याख्यान देत असून आतापर्यंत त्यांनी 12000 हून अधिक व्याख्याने महाराष्ट्रासह जगभरात दिली आहेत. आतापर्यंत त्यांनी 25 हून अधिक ग्रंथ लिहिले आहेत. ऐतिहासिक महानाट्य ‘जाणता राजा’चे लेखन करणारे शिवशाहीर, ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत म्हणून ख्यातकीर्त असलेल्या बाबासाहेब पुरंदरे यांनी केलेले लेखन लोकप्रिय आहे. संशोधनवृत्ती, संयम, चिकाटी व तीव्र स्मरणशक्ती, सखोल अभ्यासासह शिस्तबद्धता, वक्तशीरपणा ही त्यांच्या स्वभावाची खास गुणवैशिष्ट्ये. त्यांच्या विविध उपक्रमांमुळे महाराष्ट्राची गौरवशाली शिवकालीन परंपरा जनसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचली आहे. बाबासाहेब पुरंदरे वयाच्या 94 व्या वर्षीही त्याच तडफेने अफाट बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्तीच्या जोरावर शिवचरित्र आपल्या वाणीतून जिवंत उभे करतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील पुरस्कार निवड समितीत सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, सांस्कृतिक कार्य विभागाच्या सचिव वल्सा नायर सिंह, चित्रकार वासुदेव कामत, पत्रकार राजीव खांडेकर, कीर्तनकार मंगलाताई कांबळे, क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर, ॲड. उज्ज्वल निकम यांचा समावेश होता. या समितीने बाबासाहेब पुरंदरे यांच्या नावाची शिफारस केली होती.

निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्या तसेच त्याद्वारे मानवी जीवन उंचावण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला राज्य शासनातर्फे दरवर्षी महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. महाराष्ट्र भूषण हा महाराष्ट्रातील सर्वोच्च नागरी सन्मान असून हा पुरस्कार सन 1997 पासून देण्यात येतो. पु.ल.देशपांडे (साहित्य), लता मंगेशकर (संगीत), सुनील गावसकर (क्रीडा), डॉ. विजय भटकर (विज्ञान), सचिन तेंडूलकर (क्रीडा), भीमसेन जोशी (कला), डॉ. अभय बंग व राणी बंग (सामाजिक प्रबोधन), बाबा आमटे (सामाजिक प्रबोधन), डॉ. रघुनाथ माशेलकर (विज्ञान), रतन टाटा (उद्योग), रा. कृ. पाटील (सामाजिक प्रबोधन), मंगेश पाडगावकर (साहित्य), नानासाहेब धर्माधिकारी (समाज प्रबोधन), सुलोचना (मराठी चित्रपट), जयंत नारळीकर (विज्ञान), डॉ. अनिल काकोडकर (विज्ञान) यांनाही राज्य शासनामार्फत महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

गोव्यातील नाइट क्लबमध्ये सिलींडर स्फोट, 25 जणांचा मृत्यू

गोव्यातील अरपोरा परिसरात शनिवारी रात्री उशिरा एका नाईट क्लबमध्ये...

धनकवडीतील एकता सोसायटीला ८ कोटीची लाच मागणारा सहकार खात्याच्या विनोद देशमुख व भास्कर पोळला बेड्या

दोघे एसीबीच्या सापळ्यात; 30 लाखांचा हफ्ता घेताना रंगेहाथ पकडलंपुणे:...

पुणे कँटोन्मेंटमधील केंद्र शासनाच्या जागांवर जाहीर केलेल्या ‘वक्फ’ मालमत्तांची चौकशी करा

खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ...

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी...