शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचे लिखाण राष्ट्रीय तेढ निर्माण करणारे – दिग्विजयसिंह
पुणे –
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपला इतिहास तोडून-मोडून सांगण्याची सवय असून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या लिखाणामुळे जातीय तणाव वाढला असून, पुरंदरेंचे लिखाण राष्ट्रीय तेढ निर्माण होण्यास पूरक ठरल्याचे, मत काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी व्यक्त केले.
पुण्यात आज (रविवार) एका कार्यक्रमात बोलताना दिग्विजयसिंह यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्याबद्दल हे वक्तव्य केले. महाराष्ट्र सरकारने बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला आहे. या पुरस्काराविरोधात नुकतेच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलन केले होते. आता दिग्विजयसिंह यांनीही पुरंदरे यांना पुरस्कार देण्यावरून टीका केली आहे.
दिग्विजयसिंह म्हणाले, की जेम्स लेनला बाबासाहेब पुरंदरेंनी प्रोत्साहन दिले. पुरंदरेचे लिखाण राष्ट्रीय तेढ निर्माण होण्यास पूरक ठरले. छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त हिंदूचा राजा बनविण्यात आले. महाराजांनी सर्वांना सोबत घेऊन काम केले होते.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी बाबासाहेब पुरंदरे यांना विरोध करणारी अधिकृत आणि जाहीर अशी भूमिका घेतली नसली तरी त्यांच्या नेत्याकडून सातत्याने याबद्दल वादग्रस्त विधाने केली जात आहेत मोहिमा राबविल्या जात आहेत ज्यामध्ये जितेंद्र आव्हाड आणि दिग्विजयसिंह आघाडीवर आहेत . शिवसेना आणि मनसे मात्र याबाबत भाजप आणि संघाच्या भूमिकेशी सुसंगत असल्याचे दिसते आहे . शिवसेना आणि म नसे हे दोघे हि पक्ष बाबासाहेब पुरंदरे यांच्या पाठीशी खंबीर पणे पूर्वी ही उभे होते आणि आज -उद्याही राहतील मात्र सध्या दोघांनी या विषयावर मौन बाळगले आहे असे राजकीय सामिक्षकांचे म्हणणे आहे