पुणे-नगर जिल्ह्यातील शिक्षकाकडून पुण्यात बदलीच्या कामासाठी दहा लाख रुपयांची लाच स्विकारल्याप्रकरणी पुणे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रदीप ऊर्फ बाबा धुमाळ तसेच माजी अध्यक्ष रवी चौधरी तब्बल आठ दिवसांनी बुधवारी लाचलुचपत प्रतिबंध विभागापुढे शरण आले. बुधवारी सायंकाळी त्यांना शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना दोन दिवसांच्या पोलीस कोठडीचे आदेश सुनावण्यात आले.एसीबीने दिलेल्या माहितीनुसारगुरूवारी (18 मे) अहमदनगर जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकाला पुण्याच्या शिक्षण मंडळ शाळेमध्ये बदली देण्यासाठी आरोपींनी तीन लाख रुपयांची लाच मागितली होती. याप्रकरणी पुणे महापालिका शिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रदीप ऊर्फ बाबा धुमाळ, माजी अध्यक्ष रवींद्र चौधरी यांच्यासह लिपीक आणि मध्यस्थावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर आरोपी संतोष मेमाणे (लिपीक) आणि भाऊसाहेब बाबासाहेब भापकर (मध्यस्त) यांना अटक करण्यात आली होती. तर प्रदीप ऊर्फ बाबा धुमाळ (अध्यक्ष), रवींद्र चौधरी (माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य) हे फरारी झाले होते.अहमदनगर जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये नोकरी करणार्या एका शिक्षकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या शिक्षकाची पत्नी पुणे शिक्षण मंडळाच्या शाळेमध्ये शिक्षिका आहे. त्यामुळे या शिक्षकाने पुण्यामध्ये बदली मागितली होती. नगर जिल्हा परिषदेने त्याला मान्यता दिली होती. पुणे शिक्षण मंडळाची त्याला अनुमती आवश्यक होती. या शिक्षकाला हजर करुन घेण्यासाठी लेखी ऑर्डर देण्यासाठी धुमाळ, चौधरी आणि मेमाणे यांनी तीन लाख रुपयांची लाच मागितली होती. यातील एक लाख रुपये वर्षभरापुर्वी त्यांनी दिलेले होते. उर्वरीत दोन लाख रुपये देण्यासाठी या सर्वांनी शिक्षकाच्या मागे तगादा लावला होता. दोन लाख रुपयांची रक्कम रोख द्या आणि ऑर्डर घेऊन जा असे त्यांना सांगण्यात आले होते.