मुंबई-‘गर्जा महाराष्ट्र माझा‘, ‘जय जय महाराष्ट्र माझा।।‘ हे महाराष्ट्र गीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचविणारे – ‘महाराष्ट्राची लोकधारा‘ या कार्यक्रमामधून घराघरांत पोहोचलेले शाहीर कृष्णराव साबळे यांचे वृद्धापकाळाने आज (शुक्रवार) परळ येथे राहत्या घरी निधन झाले. ते 94 वर्षांचे होते.
शाहीर साबळे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शाहीर म्हणून त्यांचे मोठे योगदान होते. दिग्दर्शक केदार शिंदे हे साबळे यांचे नातू होत. ‘गर्जा महाराष्ट्र माझा‘, ‘जय जय महाराष्ट्र माझा।।‘ हे महाराष्ट्र गीत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांनी पोहोचवले होते. ‘सह्याद्रीचा सिंह गर्जतोऽऽ‘ या ओळी ऐकताना त्यांच्या पहाडी आवाजाचा प्रत्यय येत होता.
शाहीर साबळे यांचे पसरणी (ता. वाई, जि. सातारा) हे मूळ गाव. जात्यावर ओव्या गाणारी आई आणि भजनं गाणारे वारकरी वडील यांच्याकडून त्यांना गायनाचे बाळकडू मिळाले होते. शालेय शिक्षणासाठी अंमळनेरला असताना साने गुरुजींशी त्यांचा संपर्क आला. तेथे त्यांच्यावर राष्ट्रीयत्वाचे संस्कार झाले. महाराष्ट्राच्या अनेक सामाजिक व राजकीय घडामोडींत एक कलावंत-कार्यकर्ता म्हणून शाहीर साबळेंची कामगिरी नेहमीच मोलाची राहिली. 1942ची चळवळ, गोवा व हैदराबाद मुक्तिसंग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ अशा अनेक आंदोलनांसह दारूबंदीचा प्रचार, लोककलाकारांचा सांभाळ, लोकगीतांचे पुनरुज्जीवन अशा अनेक विधायक कामांतही त्यांचा मोठा वाटा आहे. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांच्या प्रवेशासाठी साने गुरुजींनी केलेल्या उपोषणाला पाठिंबा देताना त्यांच्या कलापथकाने दौरे केले. शिवसेनेच्या विस्ताराची पार्श्वभूमी तयार करण्यात त्यांची स्वतःची अन् त्यांच्या ‘आंधळं दळतंय‘ या प्रहसनाची भूमिका मध्यवर्ती होती.