पुणे : शासनाची ध्येयधोरणे, कार्यक्रम, योजना जनतेपर्यंत पोहोचवून सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचे महत्त्वाचे काम आपले आहे, ही बाब लक्षात घेवून सक्षमपणे काम करावे, अशी सूचना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (माहिती) (प्रशासन) देवेंद्र भुजबळ यांनी केली.
संचालक श्री. भुजबळ यांनी येथील विभागीय माहिती कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय यांना शुक्रवारी अचानक भेट दिली. याप्रसंगी कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. उपसंचालक (माहिती) यशवंत भंडारे, जिल्हा माहिती अधिकारी रविंद्र राऊत, सहायक संचालक (माहिती) गो.धों. जगधने यांच्यासह कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
माध्यम स्पर्धेच्या कालखंडात माहिती विभागाला अधिक सक्षम व गतीने काम करण्याची आवश्यकता नमुद करून श्री. भुजबळ म्हणाले, संचालनालयातील प्रत्येक घटक अत्यंत महत्त्वाचा असून टीमवर्कने काम करून एक सर्वोत्तम प्रतिमा निर्माण करण्याचे काम करा.
याप्रसंगी श्री. भुजबळ यांनी सर्व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. कार्यालयाचे नुतनीकरण, स्वच्छता व कार्यालयातील संसाधनांची गरज याचाही त्यांनी आढावा घेवून महत्वपूर्ण सूचना केल्या. या भेटीत त्यांनी कार्यालयाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी जिल्हा माहिती कार्यालय व माहिती केंद्रासही भेट दिली. प्रारंभी श्री. भंडारे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले