पुणे-
शासनाकडे ऑनलाईन माहिती अधिकारांतर्गत किती अर्ज प्राप्त झाले याबाबतची माहिती नसल्याचे स्पष्ट झाले आहे असा दावा माहिती अधिकार क्षेत्रातील जाणकार कार्यकर्ते आणि सुराज्य संघर्ष समितीचे अध्यक्ष विजय कुंभार यांनी केला आहे त्यामुळे ऑनलाईन माहिती अधिकाराची सुविधा केवळ नावापुरतीच उरल्याचे चित्र आहे
त्यांनी यासंदर्भात प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे कि , ऑनलाईन आरटीआय सुरू झाल्यानंतर मी शासनाकडे ऑनलाईन माहिती अधिकारांतर्गत शासनाच्या सर्व विभागांकडे मिळून एकूण किती अर्ज प्राप्त झाले ? . माहिती अधिकार अधिनियमातील कलम ६ (१) अंतर्गत अर्जांच्या फी पोटी एकूण किती रक्कम जमा झाली ? . आणि दारिद्र्य रेषेखालील किती अर्ज प्राप्त झाले ?. याबाबतची माहिती मागीतली होती. मला शासनाकडून ‘Please refer to your RTI application no.ITDEP/R/2015/60065.The information which you have requested is not available in Govt. records.‘ असे उत्तर मिळाले.
नुकतेच मी मुख्यमंत्र्याना एका पत्राद्वारे मंत्रालयातून गैरव्यवहारांना खतपाणी मिळत असल्यानेच ऑनलाईन आरटीआय ची दुरवस्था होत असल्याबद्दल लिहिले होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात प्रथम केलेल्या महत्वाच्या कामांमध्ये ऑनलाईन आरटीआयचा समावेश होता. तशी त्यासंदर्भातील यंत्रणा गेली काही वर्षे तयार होती . परंतु नोकरशाहीच्या दुराग्रहामुळे तसेच भ्रष्टाचाराला मंत्रालयातूनच खतपाणी मिळत असल्याने ती सुरू करण्यात आली नव्हती.मुख्यंमंत्र्यांच्या आग्रहाने ती सुरू करण्यात आली. परंतु नोकरशाही ती व्यवस्थित चालणार नाही याची पूर्णपणे काळजी घेत आहे.त्याचाच अनुभव सदर उत्तराने आला आहे.
मंत्रालय स्तरावर अनेक विभागांमध्ये ऑनलाईन माहिती अधिकाराचे अर्ज स्विकारले जात नाहीत . स्विकारलेल्या अर्जांना वेळेत उत्तरे दिली जात नाहीत.अनेकदा फी स्विकारली जाते परंतु अर्ज स्विकारला जात नाही.याला कारणे अनेक आहेत, त्यामध्ये मंत्रालयातील फार कमी लोकांना इंटरनेटचा व संगणकाच्या इतर सुविधांचा वापर करता येतो .बाकीचे सर्व अधिकारी व कर्मचारी संगणकाचा वापर केवळ टाईपरायटर म्हणूनच करतात या बाबीचा समावेश आहे. परंतु सर्वात जास्त महत्वाची बाब म्हणजे माहिती अधिकाराबाबत शासकीय अधिका-यांच्या मनात असलेली भिती हेच यामागचे खरे कारण आहे. भितीचीही दोन प्रमुख कारणे आहेत त्यातील पहिले भ्रष्टाचार – गैरव्यवहार हे असले तरी आपली अकार्यक्षमता उघड होण्याची भिती हेही कारण त्यामागे आहे.