सातारा- सियाचीनमधील हिमस्खलनात शहीद झालेले ‘मद्रास रेजिमेंट’चे जवान सुनील विठ्ठल सूर्यवंशी (वय २९) यांच्या पार्थिवावर मूळगावी मस्करवाडीत (ता. माण) लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शूरवीराला लष्कराच्या जवानांनी मानवंदना दिली. आई-वडील व पत्नी रेखाने सूनील यांचे अंतिम दर्शन घेतले व बंधू तानाजी व चार वर्षाच्या मुलीने मुखाग्नी दिला.
कुक्कडवाड येथून सकाळी शहीद सूनील सूर्यवंशी यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली. सूनील यांचे पार्थिव आधी घरी नेण्यात आले. तिथे त्यांच्या कुटुंबियांनी अंत्यदर्शन घेतले. सुनील यांच्या अंत्ययात्रेत मोठा जनसागर लोटला होता. ‘सुनील सूर्यवंशी अमर रहे, वंदे मातरम् , अशा घोषणांमध्ये शहीद सूनील यांना अखेरचा निरोप देण्यात आला. पंचक्रोषीतील लोक मोठ्या संख्येन सूनील यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले. सुनील सूर्यवंशी हे पाच वर्षांपूर्वी सैन्यदलात भरती झाले होते. सियाचीनला कार्यरत होते. १९ हजार ६०० फूट उंचीवरील सोनम पोस्टवर त्यांची तुकडी तैनात होती.