पाणी बचत न केल्यास रेशनवर पाणी विकत घेण्याची वेळ येईल. पर्यावरणतज्ञांनी व्यक्त केली भिती
पुणे, : “शहरातील पर्यावरणास हानीकारक ठरणारे प्रश्न व समस्यांचा शोध घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी नागरिक, प्रशासन, शासन व स्वयंसेवी संस्था स्तरावर एक सर्वसमावेशक अॅक्शन प्लॅन तयार करावा” असे मत कायदेतज्ञ अॅड. असीम सरोदे यांनी व्यक्त केले.
साखर संकुल, शिवाजीनगर येथे’लायन्स इन्व्हॅारन्मेंट एक्स्पो’ तर्फे पर्यावरणावर आधारित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादामध्ये खासदार अॅड. वंदना चव्हाण, जल अभ्यासक राजेंद्र माहुलकर, स्वच्छ संस्थेच्या मंगल पगारे, महापालिका सहायक आयुक्त सुरेश जगताप, प्रांतपाल विक्रांत जाधव, महाराष्ट्र प्रदुषण नियत्रंण मंडळाचे सहायक सचिव पी.के.मिराशे, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण बोर्डाचे दत्तात्रय देवळे यांनी सहभाग घेतला. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष लायन हसमुख मेहता, समन्वयक लायन बाळासाहेब पाथरकर उपस्थित होते.
देशभरातील पर्यावरणाची स्थिती अतिशय गंभीर व चिंताजनक आहे. वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण व विकास यासोबतच पर्यावरवरण प्रदुषण होत आहे. त्याचा परिणाम भावी पिढीवर अत्यंत धोकादायकपणे होऊ शकतो. त्यामुळे पर्यावरणाचा ढासलेला असमतोल सुरळीत करण्यासाठी आता जनतेमधून पर्यावरण जनजागृतीकरितीची व्यापक चळवळ उभी राहिली पाहिजे असे मत या परिसंवादात अनेक पर्यावरणतज्ञांनी व्यक्त केले.
अॅड.वंदना चव्हाण म्हणाल्या, “भावी पिढीस चांगले पर्यावरण मिळण्यासाठी भविष्याचा विचार करुन शाश्वत विकासास प्राधान्य देणे काळाची गरज बनली आहे. वातावरणातील होत असलेले बदल लक्षात घेऊन त्यास अपायकारक ठरणा-या लहान लहान घटकांची काळजी प्रत्येकांने घ्यायला हवी. तरच वातावरण व हवामानात होत असलेले बदल थांबतील. वातावरण व हवामानात होत असलेल्या बदलांमुळे येत्या काही दिवसात महाभंयकर प्रलंय ओढविले जाऊ शकतात. त्याचा परिणाम सर्व मानवजातीस सहन करावा लागेल. पर्यावरणाचा ह्रास थांबविण्यासाठी प्रत्येकांने आपल्यापासून सुरुवात करायला हवी.”
माहुलकर म्हणाले, “पुढील काही वर्षातील लोकसंख्येला पुरेल इतक्या पाणीसाठ्याची व्यवस्था पुणे महापालिका व शासनाने आज ही केली नसून त्याचे परिणाम येत्या काही दिवसात पुणेकरांना भोगावे लागतील. नागरिकांनी राष्ट्रीय कर्तव्ये समजून पाणी बचत करावी. मुळा-मुठा नदी, सांडपाणी व धऱणाचे पाणी यामुळे शहरात पाण्याचे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. जगासमोर ब-याच ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रामुख्याने समोर आहे. तेव्हा, पाण्याची योग्य बचत न केल्यास आपणास ही पिण्याचे पाणी रेशनवर घेण्याची वेळ येऊ शकते.”
मंगल पगारे म्हणाल्या, “नागरिकांनी इच्छाशक्ती दाखविल्यास घनकचरा समस्याचे पुर्णपणे निर्मुलन होऊ शकते. डोळसपणे बघितल्यास कच-यातून व्यवसाय निर्मिती होऊ शकते. भविष्यात कचरा वेचक कच-याची समस्या नागरिकांच्या सहकार्याने समुळ नष्ट करतील.”
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी पर्यावरणाथीमवर आधारित नृत्य, गीते व विविध कलांचे सादरीकरण केले. तसेच स्वच्छता, साफसफाई करण्याची यावेळी शपथ घेण्यात आली. शिवाय, प्रत्येकाने एक वृक्ष लागवड करावा व त्या वृक्षाचा दरवर्षी वाढदिवस साजरा करावा अशी उपस्थितांना शपथ दिली. नागरिकांना मोफत रोपांचे वाटप करण्यात आले.