“शहरांमधील सुविधा बघून सखेद आश्चर्य वाटतं.” – डॉ. निरुपमा देशपांडे
पुणे : “आज मी मेळघाटातून पुण्यात येते आणि येथील नागरिकांच्या सुख सुविधा जेव्हा बघते तेव्हा मला शहरात राहणाऱ्या लोकांचे आश्चर्य वाटतं. इतक्या सुविधा मागासवर्गीय आदिवासी प्रदेशांमध्ये केव्हा पोहचतील याबाबत मी अजूनही साशंक आहे.” अशी भावना मेळघाट मध्ये कार्य करणाऱ्या ज्येष्ठ समाज करकर्त्या डॉ. निरुपमा देशपांडे यांनी ‘संजीवनी डेव्हलपर्स’ च्या एका कार्यक्रमात व्यक्त केली.
संजीवनी डेव्हलपर्स च्या वाकड येथील सोनचाफातील सदनिकाधारी स्नेहमेळाव्यात मेळघाट येथील ‘संपूर्ण बांबू’ या संस्थेच्या ज्येष्ठ समाज कार्यकर्त्या डॉ. निरुपमा देशपांडे ह्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. पुण्यातील सर्व सुख सुविधा बघून त्यांना येथील उच्च राहणीमानाचे आश्चर्य वाटत होते तसेच आपण जेथे काम करतो तेथे या सुविधा पोचतील कि नाही याबाबतही साशंक होत्या. “मी जेथे काम करते तेथिल नागरिकांना रोज पोटभरीचं जेवण मिळेल की नाही याबाबत खात्री नसते. आज येथील एकेका सोसायटीमध्ये १५०० लोकांची वस्ती असते आणि मी १५०० लोकवस्तीच्या एका गावात राहते. त्यांना रोजगार मिळावा यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करीत असतो. आम्हीही घरे तयार करतो फरक फक्त इतकाच आहे की आमचे घर हे बांबू पासून तयार केले जाते. शहरांप्रमाणे सुविधा मिळण्यासाठी तिकडे किती वर्ष लागतील हे सांगता येणार नाही. तेथील लोकांचा रोजगाराचा प्रश्न आपल्यासारख्या सुशिक्षित सज्ञान लोकांनीच दूर केला पाहिजे. त्यांना जितकी जमेल तितकी मदत केली पाहिजे.” अशी कळकळीची भावना डॉ. देशपांडे यांनी व्यक्त केली. आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो अशी भावना प्रत्येकाने ठेवली आणि समाजाचे ऋण फेडण्यासाठी सज्ज झालोत तर गरीब – श्रीमंत यातील दरी नक्कीच कमी होईल असेही त्या यावेळी म्हणाल्या.
“थिंक ग्रीन, थिंक लाईफ़ याला अनुसरूनच आमचे प्रत्येक प्रकल्प आम्ही उभारत असतो. पर्यावरणाचा ह्रास होण्यापासून आपणच पुढाकार घ्यायला हवा. तसेच आपण जर चांगल्या लोकांमध्ये सातत्याने राहत असू तर आपल्या हातून चांगलं घडल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच आम्ही प्रत्येक सदनिकाधारी स्नेहमेळाव्यात थोर कार्य करणाऱ्या व्यक्तींना बोलवत असतो, जेणेकरून नागरिकांमध्ये सामाजिक ऋण फेडण्यासाठी उत्साह निर्माण होईल.” असे मत संजीवनी डेव्हलपर्सचे संचालक संजय देशपांडे यांनी व्यक्त केले.
सुप्रसिद्ध धावपटू स्वाती गाढवे हिचा यावेळी गौरव यावेळी करण्यात आला. तिचे आई वडील शेतमजूर असून तिच्या स्कॉलरशीप व बक्षिसांच्या मिळकतीवर त्यांचे घर चालत आहे. संजीवनी डेव्हलपर्सकडून रोख रक्कम देऊन तिचा सत्कार करण्यात आला आहे. सध्या ती येत्या ऑंलीम्पिक स्पर्धेसाठी उटी येथे तयारी करीत आहे. त्याचप्रमाणे सन्माननिय अतिथी म्हणून बँक ऑफ बडोद्याचे, पुणे विभागाचे शेखर सुरी यांनादेखील यावेळी गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीवनी डेव्हलपर्सच्या विक्री विपणन प्रमुख पल्लवी बापट व विपणन प्रमुख संजना पाटील यांनी केले.