नवी दिल्ली – सर्व विरोधी पक्षांची एकजूट ठेवण्याचे प्रयत्न करणारी शरद पवार यांची पहिली बैठक संपन्न झाली
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. शरद पवार यांच्या दिल्ली येथील ६ जनपथ या निवासस्थानी आज राष्ट्रीय पातळीवरील विरोधी पक्षांनी एकत्र येऊन देशातील सद्य परिस्थितीतील विविध समस्यांवर विचारविमर्श केला. वाढती बेरोजगारी, महिलांवरील वाढते अत्याचार यांसारखे अनेक प्रश्न ऐरणीवर आणण्याबाबत या सर्व विरोधी दलांचे एकमत झाले. तसेच श्री. शरद पवार यांच्या पुढाकाराने झालेल्या या बैठकीत विरोधी पक्षांची एकत्रित फळी सामूहिक प्रयत्नांद्वारे अधिक सक्षम राष्ट्रनिर्मितीच्या कार्यासाठी कटिबद्ध राहील व समाजाच्या सर्व घटकांना सामावून घेऊन त्यांच्या प्रगतीसाठी नियोजनपूर्वक एकत्र येईल असा संकल्प ठरवला गेला. या बैठकीला जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते डॉ. फारुख अब्दुल्ला, समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, जदयूचे अध्यक्ष शरद यादव हे हजर होते. दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनीही श्री. पवार यांना फोन करून या विरोधकांच्या फळीत सामील होण्याची इच्छा असल्याची भावना व्यक्त केली. परंतु त्यांच्या पूर्वनिर्धारित कार्यक्रमामुळे ते या बैठकीला येऊ शकले नाहीत. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी खासदार सुप्रिया सुळे, तारिक अन्वर, महंमद फैजल तसेच प्रफुल पटेल उपस्थित होते.