शरद पवार आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्षम उमेदवार प्रशिक्षण शिबीर’ 4, 5 डिसेंबर रोजी
पुणे :
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ‘सक्षम उमेदवार प्रशिक्षण’ कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमातंर्गत सक्षम उमेदवारांसाठी दिनांक 4 व 5 डिसेंबर 2016 रोजी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार उमेदवारांना मार्गदर्शन करण्यार आहेत. हे शिबिर सकाळी 10 ते सायं 5 या वेळेत, सावित्रीबाई फुले सभागृह, महात्मा फुले पेठ, पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती शहराध्यक्ष खासदार अॅड.वंदना चव्हाण यांनी पत्राद्वारे दिली.
पुणे महानगरपालिकेच्या 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अनेक इच्छुकांनी उमेदवारी मिळण्यासाठी अर्ज केलेले आहेत. यामध्ये समाजाच्या सर्व स्तरांमध्ये काम करणार्या तरुणांची संख्या जास्त आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता अतिशय मनापासून समाजासाठी काम करीत असतो, परंतु त्या सर्वांनाच महापालिकेची पूर्ण ओळख असतेच असे नाही. म्हणून त्यांच्यासाठी विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये पक्षाध्यक्ष शरद पवार -‘राष्ट्रवादी काँग्रेसचा शहर अजेंडा’, अजित पवार-‘कार्यकर्ता मार्गदर्शन’, अरूण फिरोदिया- ’शहरीकरण’, अॅड.नितीन देशपांडे-’महापालिके संबंधित कायदे’, विवेक वेलणकर-‘माहिती अधिकार’, डॉ.स्नेहा पळणीटकर-‘घनकचरा व्यवस्थापन’, अभय कुलकर्णी-मोबाईल अॅप्लीकेशन आणि सोशल मीडिया, डॉ. साहेब खानदरे-शरद पवार, द्रष्टा नेतृत्व, प्रताप आसबे-देशाची वर्तमान स्थिती, संजय आवटे- मीडिया आदींचा समावेश आहे.
यामध्ये शहरीकरणाची आव्हाने, शाश्वत शहरे आणि पर्यावरण, महानगरपालिकेने केलेली विकासकामे, महापालिकेचे कामकाज, राजकीय पक्ष आणि प्रसार माध्यमे, मानवी विकास निर्देशांक, राजकीय व सामाजिक सद्यस्थिती, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ध्येय धोरणे या विषयांवर तज्ज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.