पुणे :
शनी शिंगणापूर येथील शनीच्या मंदिरात महिलेने प्रवेश करून केलेल्या धाडसाबाबत खासदार अॅड. वंदना चव्हाण यांची प्रतिक्रिया, ‘शनी शिंगणापूर येथे नव्या क्रांतीची नांदी झाली आहे, त्याचे मनापासून स्वागतच करायला हवे. परंतु काही समुहाच्या लोकांकडून त्या युवतीच्या धाडसी कृत्याचा निषेध केला जात आहे, पावित्र्याचे सोहळे-ओवळे पाळले जात आहे. हे अतिशय निराशाजनक व अस्वस्थ करणारे आहे. 21 व्या शतकात आणि या पुरोगामी महाराष्ट्रात आज देखील स्त्रियांना याद्वारे दुय्यम स्थान समाजात आहे.
मुळातच प्रश्न धार्मिक भावनेचा नाही तर समस्त स्त्री वर्गाच्या अधिकाराचा आहे, तसेच हे वास्तव आहे. प्रत्येक वेळी अनिष्ठ, कालबाह्य होत असलेल्या रूढी, परंपरा यांचे ओझे वाहून तकलादू बनत चाललेल्या समाजाचे आजच्या या आधुनिक युगात देखील आपण मनुस्मृतीचे दाखले देत बसणार आहोत का? याचा विचार समाजातील प्रत्येक कुटुंबात व्हायला हवा.
सनातनांच्या भावना दुखावल्या जाणे हे स्वाभाविकच आहे कारण यांनी समस्त स्त्री वर्गाला व समाजातील दुर्बल घटकांना नेहमीच दुय्यम वागणूक दिली आहे व देत आहे. एकेकाळी या सनातनवाद्यांनी ‘विधवा राज़ नहीं चलेगा’ म्हणून रस्त्यांवर निदर्शने केली. आताही परिस्थितीत फरक नाही. त्यामुळे पुरोगामी विचारांचा, कृत्याचा नेहमीच बळी पडणार आहे. आपणच या विरुध्द विविध मार्गांनी लढा दिला पाहिजे यासाठी स्त्री शक्ती एकत्र आली पाहिजे.’

