” एकीकडे ‘बॉलीवूड’ तर दुसरीकडे ‘टौलीवूड’ आणि ‘कॉलीवूड’ चे आव्हान असताना मराठी चित्रपट निर्माण करून त्यास प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळविणे हे तसे खूप कठीण काम होते. मात्र ‘शटर’ या मराठी चित्रपटाने हे साहस करून दाखविले. ‘शटर’ चित्रपटाला मराठी प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिल्यामुळे ‘शटर’ च्या सर्व टीमचे प्रयत्न सार्थकी लागले. त्यामुळे आम्हाला साहजिकच आनंद झाला आहे” असे या चित्रपटाचे निर्माते आणि ‘शटर’ चित्रपटात महत्वाची भूमिका केलेले अभिनेते प्रकाश बरे यांनी गुरुवारी येथे सांगितले. ‘शटर’ चित्रपटाला मराठी प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद देवून त्याच्या ‘बॉक्स ऑफिस’च्या यशावर शिक्कामोर्तब केल्याबद्दल आयोजित करण्यात आलेल्या कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी चित्रपटातील प्रमुख अभिनेते सचिन खेडेकर, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, कौमुदी वालोकर, मनसे नेते अॅड. गणेश सातपुते तसेच वितरण व्यवस्थापक दीपक शर्मा आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित पत्रकारांनीही एक चांगला चित्रपट पाहण्याचे समाधान दिल्याबद्दल ‘शटर’ च्या संपूर्ण टीमचे कौतुक केले.
निर्माते आणि अभिनेते प्रकाश बरे पुढे म्हणाले, मूळ मल्याळी चित्रपटाचा मराठीत ‘रिमेक’ करणे आमच्या दृष्टीने तसे साहसच होते. कारण मराठी प्रेक्षक खूप चिकित्सक असतो हे आम्हाला माहित होते तरीही आम्ही मराठी प्रेक्षकांवर संपूर्ण विश्वास टाकून चित्रपट चांगला होण्यासाठी प्रयत्न केले आणि आमच्या या प्रामाणिक प्रयत्नांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली त्यामुळे शटर’ ला चांगले यश मिळू शकले. त्यामध्ये चित्रपटाच्या प्रमोशनचाही महत्वाचा वाटा होता असेही त्यांनीं सांगितले.
अभिनेते सचिन खेडेकर म्हणाले, ‘आम्ही केलेले काम प्रेक्षकांपर्यंत कशा प्रकारे पोहोंचले आहे ? त्यामुळे प्रेक्षकांचे समाधान झाले आहे की नाही याचीच कलाकारांना नेहमी उत्सुकता असते आणि त्याला प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळाली की साहजिकच आपल्या कामाचे चीज झाल्याचे त्याला समाधान लाभते. ‘शटर’ चित्रपट स्पर्धेत टिकला आणि गुणात्मकदृष्ट्या तो प्रेक्षकांना आवडल्यामुळे आम्हा कलाकारांना खूपच आनंद झाला आहे. ‘अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनेही आपल्या छोटेखानी भाषणात ‘शटर’ चित्रपटाला मिळालेल्या यशाबद्दल पुण्यात प्रथमच अशा प्रकारचा कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आल्याचे सांगून ‘शटर’ चित्रपटाला मिळालेल्या भरघोस यशाबद्दल माध्यम प्रतिनिधींचे आभार मानले. श्री दीपक शर्मा यांनी आभार मानले. ‘शटर’ हा चित्रपट अजूनही पुण्यातील सिटी प्राईड कोथरूड दु.१.१० व अभिरुची सिटी प्राईड सायं. ६.००. वा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत असून त्यास प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ‘शटर’ चित्रपटाचे दिग्दर्शक व्ही.के.प्रकाश हे स्वतः राष्ट्रीय पुरस्कार विजेते असून पाच वेगवेगळ्या भाषांमध्ये त्यांनी आजपर्यंत २० चित्रपट केले आहेत. सजीव एम.पी आणि प्रकाश बरे यांनी या सिनेमाची निर्मिती केली असून पटकथा आणि संवाद मनिषा कोरडे यांनी लिहिले आहेत. के. के. मनोज यांनी छायांकन केले असून भक्ती मायाळू यांनी संकलन केले आहे. तर प्रसिद्धीप्रमुख रामकुमार शेडगे हे आहेत. मंगेश कांगणे आणि अश्विनी शेंडे यांनी ‘शटर’ची गीते लिहिली असून पंकज पडघन यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे.