पुणे- पुण्यातील न-हे-आंबेगाव येथे इमारत कोसळून एका तरुणाचा मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी बिल्डर आणि जागामालकासह तिघांना शनिवारी अटक केली. त्यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
किशोर पितांबर वडगामा (वय 48, रा. नऱ्हे गाव), रणजित संभाजी देसाई (वय 40, रा. सहकारनगर) आणि कैलास कृष्णा कंक (वय 48, रा. बिबवेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
नऱ्हे ग्रामपंचायतीच्या हद्दीत शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास “पिताराम कॉम्प्लेक्स‘ ही इमारत कोसळून संगणक अभियंता संदीप दिलीप मोहिते (वय 29) यांचा मृत्यू झाला. शिवाय इमारतीत राहणाऱ्या नऊ कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले. या घटनेनंतर सिंहगड पोलिसांनी काल चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यानंतर शनिवारी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
नऱ्हे ग्रामपंचायत हद्दीत बांधण्यात आलेल्या “पिताराम कॉम्प्लेक्स‘ची जागा रणजित देसाई आणि सीताबाई ज्ञानोबा रानवडे यांची आहे. त्या जागेवर व्ही. के. असोसिएट्सचे मालक किशोर वडगामा आणि प्रकाश रामचंद्र कंधारे यांनी इमारत बांधली. त्यांच्यासह आरसीसी डिझायनर डेलकॉन कंपनीचे बाळ कुलकर्णी आणि पिताराम कॉम्प्लेक्सचे आर्किटेक्ट, आरसीसी कन्सल्टंट, कंत्राटदार, बांधकाम साहित्य पुरवठादार आणि त्यांच्या सहाय्यकांची चौकशी करण्यात येत आहे. चौकशीनंतर या दुर्घटनेस जबाबदार प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि संबंधितांवरही गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
पिताराम कॉम्प्लेक्समधील रहिवासी इमारत कोसळण्यापूर्वी वेळीच घराबाहेर पडल्याने एक तरुण वगळता सर्वांचे जीव वाचले. केवळ अंगावरील कपड्यानिशी बाहेर पडलेल्या रहिवाशांचे संसार उपयोगी साहित्य ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे त्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
इमारतीमधील काही रहिवाशी नातेवाइकांच्या घरी आणि इतरत्र राहण्यास गेले आहेत. परंतु त्यांचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल, बॅंक पासबुक, एटीएम कार्ड आणि महत्त्वाची कागदपत्रे ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. त्या वस्तू आणि कागदपत्रे ढिगाऱ्यातून सापडतील या आशेने काही जण त्याचा शोध घेत आहेत. दुर्घटनेच्या दिवशी ढिगारा उपसताना सापडलेले काही दागिने आणि रोख रक्कम असलेली पर्स आणि पासपोर्ट पंचनामा करून पोलिसांनी संबंधितांना सुपूर्त केला आहे. सर्व काही जमीनदोस्त झाल्यामुळे साधा चहा प्यायचा तरी खिशात पैसे नाहीत. काही रहिवाशांनी शुक्रवारी रात्री बाजूच्या इमारतीत आसरा घेतला. शनिवार उजाडताच ढिगारा उपसताना आपले सामान मिळेल, या अपेक्षेने तेथील रहिवाशी दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या परिसरात आले. महत्त्वाच्या वस्तू मिळाव्यात यासाठी त्यांचा जीव टांगणीला लागला आहे.सहाव्या मजल्यावर राहणारे प्रकाश यादव यांना पासपोर्ट आणि पत्नीची पर्स मिळाली. पार्किंगमध्ये मोटारीत महत्त्वाची कागदपत्रे अडकली आहेत; परंतु संपूर्ण ढिगारा उपसल्यानंतरच काही वस्तू हाती लागण्याची शक्यता आहे.
महापालिका हद्दीलगतच्या गावांमधील अनधिकृत बांधकामाची पाहणी करण्यासाठी तलाठ्यांची पथके नियुक्त करण्यात येतील. येत्या सोमवारपासून ही पाहणी केली जाईल. महापालिकेने मदत केल्यास, अनधिकृत बांधकामाविरुद्ध कारवाई केली जाईल, असे प्रभारी जिल्हाधिकारी प्रदीप पाटील यांनी शनिवारी सांगितले.
दुर्घटना घडल्यानंतर, कारवाईसंदर्भात पाटील म्हणाले, ‘त्या इमारतीच्या पहिल्या दोन मजल्यावर वाहनतळ आणि त्यावर चार मजले बांधण्यास परवानगी देण्यात आली होती. बांधकाम व्यावसायिकाने त्यावर आणखी एक अनधिकृत मजला बांधला होता. तेरा गुंठे जागेवर ही इमारत बांधली होती. त्याला अकृषी प्रमाणपत्र देण्यात आले होते. त्या इमारतीचे प्लिंथ चेकिंग नगररचना विभागामार्फत झाले होते. मात्र, बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देण्यात आला नव्हता. संबंधित बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.‘‘
‘प्रांत अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, नगर रचना विभागाचे व महापालिकेचे अधिकारी यांची बैठक सोमवारी घेण्यात येईल. त्यामध्ये अनधिकृत बांधकामाच्या पाहणीबाबतचा तपशील ठरविला जाईल. त्यानुसार, अशा बांधकामांची पाहणी करून अहवाल तयार केला जाईल. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ती बांधकामे पाडण्यासाठी कर्मचारीवर्ग आणि यंत्रसामग्री नाही. महापालिकेने ती उपलब्ध करून दिल्यास, अनधिकृत बांधकामांविरुद्ध कारवाई केली जाईल. यापूर्वीच्या मोहिमेत 22 इमारतींविरुद्ध कारवाई करण्यात आली होती,‘‘ असे त्यांनी सांगितले.पाटील म्हणाले, ‘नोंदणी विभागाच्या दुय्यम सहनिबंधकांनाही अशा इमारतीच्या खरेदी विक्रीची नोंदणी न करण्याची सूचना देण्यात येईल. नोंदणी महानिरीक्षक यांना आम्ही त्यासंदर्भात कळविणार आहोत.‘‘