डॉ. प्रकाश बाबा आमटे – द रिअल हिरो
गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा हा अतिदुर्गम जंगलातील भाग. जिथे शहरातील माणूसच काय पण सूर्यकिरणंही पोहचणं अवघड होतं. जगाची गोष्ट तर दूरच पण महाराष्ट्राच्या नकाशावरही अशा गावाचे पुरावे मिळणं कधी काळी अशक्य होतं. अशा ठिकाणी जाऊन शहराचे सुखवस्तू जीवन नाकारून आयुष्याची एक नवी सुरुवात करणं ही कल्पनाही अशक्यच. पण ही कल्पनाच नव्हे तर ते स्वप्न उराशी बाळगून एक अवलिया आपल्या पत्नी आणि सहका-यांसह तिथे जातो…. आपल्या निस्सीम, निःस्वार्थ सेवेने आदिवासींच्या जीवनात नंदनवन फुलवतो आणि हेमलकसाला जगाच्या नकाशावर नेऊन ठेवतो. हा अवलिया म्हणजे ज्येष्ठ समाजसेवी डॉ. प्रकाश बाबा आमटे. समर्पण या शब्दाला जागणारे नव्हे तर जगणा-या डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी आमटेंची ही कथा आता चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर बघायला मिळणार आहे , “डॉ. प्रकाश बाबा आमटे – द रिअल हिरो” या मराठी चित्रपटामधून. अॅड. समृद्धी पोरे यांचे निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात डॉ. प्रकाश आमटेंची भूमिका सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर साकारत असून डॉ. मंदाकिनीं आमटेंच्या भूमिकेत सोनाली कुलकर्णी असणार आहे. यावर्षी ‘टाइमपास’, ‘फॅंड्री’ आणि ‘लय भारी’ सारखे सुपरहिट चित्रपट देणा-या झी टॉकीज आणि एस्सेल व्हिजनची प्रस्तुती असलेला हा चित्रपट १० ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
हेमलकसाला १९७३ साली लोकबिरादरी प्रकल्प सुरू झाला तेव्हा तिथले माडिया गोंड आदिवासी भूक, रोगराई, अंधश्रद्धा यांच्या विळख्यात सापडले होते. त्या जंगलापलिकडचं जग त्यांना माहीत नव्हतं. शिक्षणाअभावी असलेलं अज्ञान, नक्षलवादी भाग, पोलिसी अत्याचार, शहरीकरणाचा वाराही जिथे पोहचलेला नाही असं जीवन तेथील आदिवासी जगत होते. त्यांना आरोग्याचं, शिक्षणाचं महत्त्व पटवून देत मुख्य प्रवाहात आणणं हे काम जेवढं जिकिरीचं तेवढंच आव्हानात्मकही होतं. हे आव्हान पेलत डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांनी आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर या आदिवासीपाड्यांमध्ये ज्ञानाचं नंदनवन फुलवलं. या ‘अंधाराकडून उजेडाकडे’ झालेल्या प्रवासाचे संपूर्ण श्रेय लोकबिरादरी प्रकल्पाच्या विलक्षण प्रयत्नांना आहे. व्रतस्थ समाजसेवी बाबा आमटेंचं समाजसेवेचं व्रत स्वीकारलेल्या डॉ. प्रकाश आमटे दाम्पत्याने, त्यांच्या सहका-यांनी आणि आमटेंच्या तिस-या पिढीनेही आचरलेल्या एका विलक्षण जीवनप्रवासाची, या सा-यांच्या जबरदस्त इच्छाशक्तीची, दुर्दम्य जिद्दीची कहाणी म्हणजे “डॉ. प्रकाश बाबा आमटे – द रिअल हिरो” हा मराठी चित्रपट.
बाबा आमटे यांनी अभिनते नाना पाटेकर यांना आपला मानसपुत्र मानलं होतं. विकास आणि प्रकाश सोबत नाना हा आपला तिसरा मुलगा आहे असं ते कायम म्हणत. नाना पाटेकरांनीही हे नातं बाबांच्या हयातीत आणि त्यानंतरही जपलं. प्रकाश आमटेंचं कार्य, आयुष्य नानांनी अगदी जवळून बघितलं आहे. त्यामुळे ही भूमिका त्यांच्यासाठी जेवढी सोपी तेवढीच आव्हानात्मक आणि जबाबदारीचीही होती. नानांनी ती जबाबदारी प्रेमाने स्वीकारत ही भूमिका साकारली आणि आज जगभरातील विविध चित्रपट महोत्सवामंध्ये त्यांचं कौतुक होत आहे. सोनाली कुलकर्णीनेही मंदाकिनी आमटेंच्या भूमिकेत जीव ओतला आहे. नाना पाटेकर आणि सोनाली कुलकर्णी यांचा कसदार अभिनय आणि डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांचं प्रेरणादायी कार्य याची उत्तम सांगड असलेला “डॉ. प्रकाश बाबा आमटे – द रिअल हिरो” हा चित्रपट १० ऑक्टोबरपासून सर्वत्र प्रदर्शित होत आहे. चित्रपटात डॉ. मोहन आगाशे यांनी बाबा आमटेंची भूमिका साकारली आहे. महेश अणे यांचे छायाचित्रण तर अभिषेक रेडकर यांनी कला दिग्दर्शन केलं आहे. गुरू ठाकूर यांच्या गीतांना राहुल रानडे यांनी संगीतबद्ध केलं आहे. “मला आई व्हायचंय” या चित्रपटाच्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका अॅड. समृद्धी पोरे यांनी या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं आहे, गोल्डन ग्लोबच्या रेणूका हावरे यांची सहनिर्मिती आहे तर प्रस्तुती झी टॉकीज आणि एस्सेल व्हिजनची आहे.