पुणे -कुटुंबीयांकडून प्रेमविवाहाला विरोध होण्याच्या भीतीने एका प्रेमीयुगुलाने शिवाजीगर येथील कृषी महाविद्यालयाच्या आवारातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ते दोघेही गेल्या २ ऑक्टोबरपासून बेपत्ता होते.
अभिजित तिमय्या मांडे (वय १९) आणि यशोदा लक्ष्मण म्हेत्रे (वय २४, रा. दोघेही विष्णू कृपा नगर, शिवाजीनगर बसस्थानकाजवळ) अशी आत्महत्या केलेल्या युगुलाची नावे आहेत. आज (शुक्रवारी) सकाळी कृषी महाविद्यालयाच्या आवारातील विहिरीत दोघांचे मृतदेह तरंगताना नागरिकांना दिसले. त्यांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलीस उपायुक्त एम. बी. तांबडे, सहायक पोलीसआयुक्त रमेश गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन. व्ही. जाधव, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक एच. एन. शिरसाठ, उपनिरीक्षक दर्शन पाटील, प्रसाद पवार आदी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी दोघांचे मृतदेह बाहेर काढले. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन. व्ही. जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार अभिजितचे बारावीपर्यंत शिक्षण झाले असून, तो सध्या बेकार होता. तर यशोदाचे जास्त शिक्षण झाले नव्हते. ती घरातून शिवणकाम करीत होती. या दोघांच्या वडिलांचे निधन झाले असून ते आपापल्या आईसोबत राहात होते. यशोदा आणि अभिजित यांच्यात मागील काही महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, ती त्याच्याहून वयाने मोठी होती. विवाहाला विरोध होण्याच्या शक्यतेने दोघांनीही २ ऑक्टोबरपासून घर सोडले होते. ते दोघे बेपत्ता असल्याची तक्रार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे