मुंबई: मालवणीमधील विषारी दारुच्या बळींची संख्या 98 वर पोहोचली आहे. या घडीला 45 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. याप्रकरणी ममता यादव, आणि ग्रेसी आन्टी या दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत सात जणांना जेरबंद करण्यात आलं आहे. तर याप्रकरणी आधीच एकूण 8 पोलीस आणि 4 उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. तसंच या संपूर्ण प्रकाराची कसून चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.
मालाडच्या मालवणी परिसरात विषारी दारू प्यायल्यानं अनेकांची प्रकृती बिघडली. त्यानंतर सुरु असलेलं हे मृत्यूचं तांडव कायम आहे.दरम्यान, याप्रकरणातील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारने प्रत्येक एक लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री निधीतून ही रक्कम देण्यात येणार असल्याचं, मुंबई उपनगर पालकमंत्री विनोद तावडे यांनी केली. ही मदत तातडीने पीडित कुटुंबियांना देण्यात येईल, असं तावडे म्हणाले. सोमवारी याबाबतची कागदपत्र तपासून प्रत्यक्ष मदत देण्यात येईल.दरम्यान, तावडे यांनी अतिरिक्त पोलिस आयुक् फत्तेसिंह पाटील, जिल्हाधिकारी शेखर चेन्ने आणि उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यामध्ये त्यांनी याप्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करा, तसंच या भागातील सर्व दारू भट्ट्या उखडून काढा, असे आदेश दिले.

