: साहित्य संमेलनातून विविध साहित्य प्रवाह एकत्र येण्याची पर्वणी साधली जात असून, ते यशस्वी करण्यासाठी धडपडणाऱ्यांना समाजाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला पाहिजे, असे मत कवी संदीप खरे यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संयोजन समितीच्या वतीने शाळा, महाविद्यालये आणि वाचनालयातून साहित्यिक आपल्या भेटीला या उपक्रमाचा शुभारंभ डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड येथे करताना श्री. खरे बोलत होते. संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला, मुख्याध्यापक नागेश मोने, पर्यवेक्षिका मनिषा मीनोचा व्यासपीठावर उपस्थित होत्या.
श्री. खरे पुढे म्हणाले,’मराठीतील चांगल्या साहित्याची ओळख मुलांना करून देण्याची जबाबदारी मोठया व्यक्तिंची आहे. मुलांसाठी वेळ काढला पाहिजे. नवीन माध्यमांबरोबर मुलांना चांगली पुस्तके आणून दिली पाहिजेत. साहित्यिकांनीही थेट वाचकापर्यंत पोहोचून संवाद साधणे आवश्यक आहे.’
घुमान, पंजाब येथे होणाऱ्या संमेलनाचे निमंत्रण आणि माहिती दोन लाख कुटुंबांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा उपक्रम हाती घेतल्याचे श्री. देसडला यांनी सांगितले.
‘अग्गोबाई, ठग्गोबाई,लागली कळ…..’ आणि ‘कोण कोण वर्गांमध्ये हात करा वर….’ या खरे यांनी सादर केलेल्या गाण्यांना विद्यार्थ्यांनी टाळयांची साथ देत जोरदार प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांचे कला गुण हेरत संतोष वाघमारे, उन्मेष हर्डीकर अभिषेक हजारे या विद्यार्थ्यांकडून गाणी म्हणून घेतली.