ताज हॉटेलमध्ये झालेल्या इन्शुरन्स इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या हीरक महोत्सवी कार्यक्रमाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. यावेळी राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, इन्शुरन्स इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष ए.के. राय, भारतीय आयुर्विमा महामंडळाचे अध्यक्ष एस.के. रॉय उपस्थित होते.
उपराष्ट्रपती म्हणाले, निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसण्यापासून शेतकऱ्याला वाचविणे आवश्यक आहे. वाढत्या शेतकरी आत्महत्या व त्यांच्या कुटुंबावर होणाऱ्या आर्थिक आणि सामाजिक दुष्परिणामाचे निवारण होण्याची गरज आहे.
पेरणी केलेल्या क्षेत्रापैकी केवळ 12 टक्के क्षेत्राला सध्या पीक विमा संरक्षण मिळते आणि अनेकदा विमा हप्ता आणि दावा यांचे प्रमाण प्रतिकूल असते. पीक विमा योजनेचा आराखडा आणि अंमलबजावणीतही त्रुटी असून विमा पर्याय अधिक आकर्षक आणि वाजवी ठरावा यासाठी फेअर प्रिमियम दर कमी करण्याचे आवाहन उपराष्ट्रपतींनी केले.
भारताच्या कृषी क्षेत्राला दुष्काळ, पूर, कीड आणि रोगांच्या प्रादुर्भावाला मोठ्या प्रमाणात तोंड द्यावे लागते. अद्ययावत पर्जन्यमापक संरचनेच्या सहाय्याने पर्जन्य विम्याद्वारे या समस्येवर काही प्रमाणात मात करता येऊ शकते. खाजगी आणि सार्वजनिक विमा कंपन्या सध्या पर्जन्य विमा उत्पादनांच्या शक्यता आजमावून पाहत आहेत आणि त्याला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
पारंपरिक पीक विम्याऐवजी शेतकऱ्यांना हवामान दर्शक विमा योजना अल्प दरात देण्याचा यशस्वी प्रयोग रवांडा, घाना, सेनेगल आणि इतर आफ्रिकी देशांनी केल्याचे उदाहरण त्यांनी दिले. गरिबांसाठीच्या विमा तरतुदी, दारिद्रय निर्मूलनाच्या लढ्याविरोधात महत्त्वाच्या ठरु शकतात, असेही उपराष्ट्रपतींनी यावेळी सांगितले.
प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना यासारख्या योजनांद्वारे गरिबांना विमा छत्राचा लाभ देण्यासाठी आणि आर्थिक सर्वसमावेशकतेला चालना देण्यासाठी सरकारने धोरणे निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले.
इन्शुरन्स इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने विमा क्षेत्रात केलेले काम उल्लेखनीय आहे. विमा क्षेत्रात अधिकाधिक कुशल मनुष्यबळ विकसित करण्याची गरज असून त्याद्वारे अनेकांना रोजगाराची संधी प्राप्त होण्यास मदतच होणार आहे, याकामी इन्शुरन्स इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने पुढाकार घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
इन्शुरन्स इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष ए. के. राय यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाची सुरूवात आणि सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
इन्शुरन्स इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया विषयी..
इन्शुरन्स इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया म्हणजे आधीची जे सी सेटलवाड मेमोरियल फेडरेशन ऑफ इन्शुरन्स इन्स्टिट्यूट, 1955 मध्ये स्थापन झाले. देशात विमा शिक्षण आणि प्रशिक्षणाला प्रोत्साहन देणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश. आयु आणि सर्वसाधारण विमा संस्थेच्या विविध शाखांमध्ये, विमा एजंट आणि सर्वेक्षकासाठी नियमित परीक्षा घेण्याबरोबरच लायन्सशिएट, असोसिएटशिप आणि फेलोशिप सारख्या व्यावसायिक परीक्षाही ही संस्था घेते. संस्थेकडून प्राप्त झालेल्या पात्रतेला, विमाउद्योग, सरकारी संस्था, आयआरडीएआय आणि भारतातल्या इतर संस्था तसेच सीआयआय, एआयसीपीसीयू, एल ओएमए तसेच कॅनडा आणि परदेशातल्या विमा संस्थेची मान्यता आहे.

