पुणे-कॉंग्रेस नेते नारायण राणे यांचे समर्थक आणि माजी आमदार विनायक निम्हण यांची आज “घर वापसी‘ झाली. निम्हण यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निम्हण यांना पुणे शहरप्रमुखपदाची जबाबदारी दिली आहे. माजी मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्या वेळी त्यांच्या सोबत काही शिवसेना नेते आणि कार्यकर्ते गेले होते, त्यांच्यात निम्हण यांचा समावेश होता.
विनायक निम्हण यांची तब्बल दहा वर्षांनी “घर वापसी‘ केली आहे. निम्हण 1999 ते 2014 अशी 15 वर्षे पुण्यात शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून आमदार होते. यातील पहिल्या दोन टर्म ते शिवसेनेचे आमदार होते आणि नंतरचे पाच वर्षे ते कॉंग्रेसचे आमदार होते. त्यांचे पुत्र सनी निम्हण हे नगरसेवक असून, युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आहेत. लवकरच त्यांचाही शिवसेना प्रवेश होण्याची शक्यता आहे.
निम्हण यांच्या शिवसेना प्रवेशामुळे राणेंसोबत गेलेले तत्कालीन सर्व आमदार शिवसेनेत परतल्याचे चित्र आहे. निम्हण यांना यंदाच्या निवडणुकीत शिवाजीनगरमधून भाजपच्या उमेदवारांकडून पराभव पत्कारावा लागला होता. राणेंसोबत कॉंग्रेसमध्ये गेलेले पण पुन्हा शिवसेनेत परतलेल्या राणे समर्थकांत सदा सरवणकर, रवींद्र फाटक, जयवंत परब, श्रीकांत सरमळकर, राजेंद्र राऊत, सुभाष बने, गणपत कदम यांचा समावेश आहे. नारायण राणेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.