मुंबई- नागरीकांमध्ये विद्युत सुरक्षिततेचे महत्व व जागरुकता निर्माण करण्यासाठी उर्जा विभागाच्या
कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. असे आवाहन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे विद्युत सुरक्षा सप्ताहाचा उद्घाटन समारंभ श्री. बावनकुळे यांच्या
हस्ते संपन्न झाला, यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव
मुकेश खुल्लर, मुख्य विद्युत निरीक्षक सुहास रा. बागडे, महानिर्मितीचे महाव्यवस्थापक बिपिन श्रीमाळी आदी उपस्थित
दि. 11 ते 17 जानेवारी, 2015 दरम्यान हा सप्ताह साजरा होत असून या सप्ताहाच्या निमित्ताने ‘विद्युत
सुरक्षितता, सर्वोच्च प्राथमिकता’ या ब्रीद वाक्याचे ऊर्जामंत्री श्री. बावनकुळे आणि ‘विद्युत सुरक्षा संबंधी नियमावली
असणाऱ्या पुस्तीकेचे’ मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या हस्ते उद्घाटन करुन विना अपघात (झिरो ॲक्सिडेन्ट) काम
करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
कर्मचाऱ्यांनी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील अपघातग्रस्त ठिकाणांची चौकशी करुन तेथे तात्काळ सुधारणा
करावी आणि प्रत्येक जिल्ह्याचा डीपीआर सादर करावा. प्रत्येक कर्मचाऱ्याने आपले काम अधिक जागरुकपणे आणि
जबाबदारीने पार पाडावे. सुरक्षेसाठी देण्यात आलेल्या साधनांचा वापर उर्जा कर्मचाऱ्यांनी करावा जेणेकरुन अपघातांचे
प्रमाण कमी करता येईल. सर्वसामान्यांचे जीवन सुरक्षित रहावे या करीता वीजेचा सुरक्षितरीत्या वापर होणे अत्यंत
आवश्यक आहे. वीजेला आपल्या जीवनात अतिशय महत्वाचे स्थान आहे. वीजेशिवाय जनजीवन याची आपण कल्पनाही
करु शकत नाही. म्हणून या वीजेचे संवर्धन करणे आणि त्यापासून अपघात होणार नाही याची दक्षता घेणे यासाठी ऊर्जा
विभागाने ह्या सप्ताहाचे आयोजन केले आहे.
शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात अपघातांचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते त्यामुळे लोकांपर्यंत
प्रबोधनात्मक विचार रुजविणे ही काळाची गरज आहे. हे ओळखून या सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने प्रत्येक जिल्ह्यातील
गावागावात जनजागृती होण्यासाठी पथनाट्य, चर्चासत्रे, बॅनर, रॅली, होर्डिग्ज, वीजेचे बील अशा विविध प्रचार
माध्यमांचा वापर करुन लोकांपर्यंत माहिती पोहचविण्याचे काम केले जाणार आहे असेही श्री. बावनकुळे यांनी यावेळी
सांगितले.
या सप्ताहानिमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती वाढावी यासाठी शालेय स्तरावर विद्युत सुरक्षा सप्ताहाचे
आयोजन केले जाणार असून या दरम्यान वीद्युत सुरक्षा सप्ताह या विषयावर निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, आणि
मार्गदर्शनपर व्याख्याने असे उपक्रम राबविण्यात येणार आहे. जेणे करुन पुढच्या पीढीला त्याचा फायदा होईल.
वीजेचे अपघात टाळण्यासाठी किंवा हे प्रमाण कमी करण्यासाठी करार तत्वावर काम करणाऱ्या प्रत्येक
कर्मचाऱ्याला स्किल डेव्हलमेंन्टचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. तसेच वीज बील संदर्भातील तक्रारी कमी करण्यासाठी
जिल्हास्तरावरील कर्मचाऱ्यांना टेस्ट रिपोर्ट लायसन्स देण्यात येणार आहे.
यावेळी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, उर्जा विभागाचे प्रधान सचिव मुकेश खुल्लर यांनीही उपस्थितांना
मार्गदर्शन केले.