नवी दिल्ली: जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. जेव्हा देशातील युवा शक्ती, विद्यार्थी शक्ती जागृत होते, तेव्हा देशात परिवर्तन घडतं. पोलिसांनी विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठीमार केला असून भाजपच्या अहंकारामुळे सुरू झालेलं हे दमनचक्र म्हणजे मोदी सरकारच्या अंताची सुरुवात आहे, अशी घणाघाती टीका सोनिया गांधी यांनी केली आहे.
सोनिया गांधी यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी करून भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. देशात शांतता प्रस्थापित करणं, कायदा सुव्यवस्था राखणं आणि देशाच्या संविधानाचं संरक्षण करणं हे सरकारचं काम आहे. मात्र भाजप सरकारने देश आणि देशवासियांवरच हल्ला चढवला आहे, अशी टीका सोनिया गांधी यांनी केली आहे.