पुणे- माहिती आणि प्रसारण मंत्रालय, फिल्म अँड टेलिव्हीजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) यांच्या वतीने आयोजित तिसरा राष्ट्रीय विद्यार्थी चित्रपट पुरस्कार आणि विद्यार्थी चित्रपट महोत्सव २४ ते २८ फेब्रुवारीदरम्यान होणार आहे.
या महोत्सवात देशविदेशातील २२ संस्थांमधील ६६ चित्रपट स्पर्धा विभागासाठी निवडण्यात आले असून, महोत्सवात साडेतीनशेपेक्षा जास्त लघुपट बघण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती एफटीआयआयचे संचालक डी. जे. नारायण यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
चित्रपटाचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन केले जाते. मागील वर्षीचा महोत्सव सत्यजित रे एफटीआयआय कोलकाता येथे झाला होता.
याविषयी बोलताना नारायण म्हणाले, महोत्सवाचे उद््घाटन २४ फेब्रुवारीला अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आणि दिग्दर्शक अदुर गोपालकृष्णन यांच्या हस्ते सायंकाळी ६ वाजता एफटीआयआय येथे होणार आहे. महोत्सवात एकूण ३७५ चित्रपट, लघुपट पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. एफटीआयआय प्रीव्ह्यू थिएटर, मेन थिएटर येथे चित्रपट दाखविले जाणार आहेत महोत्सवामध्ये २५ फेब्रुवारीला सायंकाळी ६ वाजता क्र.१ च्या स्टुडिओमध्ये सुफी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम मदन गोपाल सिंग, प्रीतम घोशाल, दीपक कॅस्टेलिनो आणि गुरुमितसिंग खोखार सादर करतील. २७ फेब्रुवारीला सायं. ६ वाजता याच ठिकाणी ज्येष्ठ अभिनेते टॉम अल्टर हे एका बेन्जामिन ग्रुपबरोबर यादी हे नाटक सादर करणार आहेत.राष्ट्रीय विद्यार्थी चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने गुरूंचा सन्मान म्हणून यावर्षीपासून एफटीआयआयमध्ये विद्यार्थी घडविणार्या शिक्षकांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. १९६२ ते नव्वदच्या दशकापर्यंत एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांना सिनेमॅटोग्राफीचे प्रशिक्षण देणारे के. पी. आर. नायर आणि १९६७ पासून आजपर्यंत विद्यार्थ्यांना अभिनयाचे धडे देणार्या रोशन तनेजा यांना पहिला जीवनगौरव सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.

