बीड – विकास हवा असेल तर भाजपाला स्पष्ट बहुमत द्या असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे महाराष्ट्रातील मतदारांना केल.
केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर महाराष्ट्रासाठी मी काय केलं? हे सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बीड मध्ये सांगितले कि, जपानबरोबर झालेल्या करारात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा प्रकल्प आणला. एवढचं काय तर चीन महाराष्ट्रात उद्योगिक पार्क बनवणार आहे. तसंच गोपीनाथ मुंडेंच बीडमध्ये रेल्वे आणण्याचे स्वप्नही पूर्ण करणार असल्याचं आश्वासन मोदींनी दिलं.तसेच
यावेळी गेल्या १५ वर्षात महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने काय दिलं? या सरकारने एक पूर्ण पिढीच उद्धवस्त केली. मुख्यमंत्र्यांमागून मुख्यमंत्री बदले, जे मुख्यमंत्री झाले त्यांचं स्वप्न पूर्ण झालं पण जनतेचं स्वप्न अधुरच राहिलं. महाराष्ट्रात गेल्या १५ वर्षात होता कौन बनेगा अरबपती हा खेळ सुरू होता. हे राष्ट्रवादी नव्हे भ्रष्टाचार वादी आहेत, अशी सणसणीत टीकाही मोदींनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर केली.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आपली पहिलीच सभा घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर घणाघाती टीका केली. पण शिवसेना किंवा युतीबद्दल कोणताही उल्लेख न करता राज्यात विकास हवा असेल तर फक्त भाजपला स्पष्ट बहुमत द्या असे वारंवार सांगितले.
राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदींची राज्यातील पहिली प्रचारसभा बीडमध्ये झाली. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा पालवे मुंडे आणि डॉ. प्रितम मुंडे यांच्यासाठी ही सभा झाली. गोपीनाथ मुंडे असते तर आपल्याला महाराष्ट्रात प्रचारसभा घेण्याची गरजच पडली नसती. सभेसाठी एवढ्या मोठ्या संख्येनं लोटलेला हा जनसागर गोपीनाथ मुंडेंच्या तपस्येचं फळ आहे, असं मोदी म्हणाले.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रचारसभांमधून भाजपला लक्ष्य केले आहे. यापार्श्वभूमीवर मोदी प्रचारसभेत काय बोलतील याची उत्सुकता होती. पण मोदींनी शिवसेनेला प्रत्युत्तर देण्याचं टाळत युती तुटण्यावर चकार शब्दही काढला नाही. पण महाराष्ट्राला गुजरातपेक्षाही पुढे न्यायचं असेल तर दिल्लीप्रमाणे राज्यातही भाजपचं स्थिर सरकार द्या, असं आवाहन मोदींनी अनेकदा केलं.