पुणे- महाड-भोर रस्त्यावरील वरंधा घाटाजवळील आंबेघर येथे मंगळवारी मध्यरात्री अल्टो कार नदी कोसळून पिंपरी-चिंचवड शहरातील५ जणांचा मृत्यू झाला आहे. यात दोन महिला व पुरुषांसह एका लहान मुलांचा समावेश आहे. हा अपघात कशामुळे व किती वाजता झाला हे अद्याप पुढे आले नाही. मात्र, मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाल्याचे स्पष्ट होत आहे. अपघातातील मृत चिंचवड गावातील रहिवासी व एकाच कुटुंबातील आहेत.
वरंधा घाटात मध्यरात्रीनंतर अपघात-एकाच कुटुंबातील ५ जणांचा दुदैवी मृत्यू
दत्तात्रय भोसले (५३), लिलाबाई भोसले (४९), प्रविण भोसले ( २९), रिद्धी भोसले (२२) व शौर्य भोसले ( दीड वर्षे, सर्व रा. निला विहार बिल्डींग, मोहननगर, चिंचवड) अशी मृत्यू झालेल्या एकाच कुटुंबातील व्यक्तींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरात राहणारे भोसले कुटुंबिय महाडहून पुण्याकडे येत होते. बुधवारी पहाटे येत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कठडा तोडून अल्टो कार निरा नदीत पडली. नदीत पाणी मोठ्या प्रमाणात असल्याने कारमधील पाचही लोकांचा बुडून मृत्यू झाला. सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.