झी मराठीची नवी कौटुंबिक मालिका
प्रत्येक वडिलासाठी आपली मुलगी ही ‘राजकन्या’ असते आणि मुलीसाठी आपले वडिल हे ‘सुपरहिरो’ असतात. आपले सर्व लाड पुरवण्यासाठी ज्यांच्याकडे हट्ट धरता येतो अशी हक्काची व्यक्ती म्हणजे वडिल हे मुलींना माहित असतं. ज्यांचं बोट धरून इवलीशी पाऊलं चालायचं शिकतात ते वडिलच असतात, पहिल्यांदा सायकल शिकतांना मागे आधार देणारा आणि आत्मविश्वास देणारा हात वडिलांचाच असतो. ज्यांच्या कुशीत झोपल्यावर सर्व भीती दूर होऊन शांत झोप लागते, ज्यांच्या खांद्यावर बसून केलेल्या सफरीत सारं जग खुजं वाटतं, आपले हट्ट पूर्ण करण्यासाठी जो दिवस रात्र राबतो, आपल्या डोळ्यात फुलणारी स्वप्न पुर्ण करण्यासाठी जो धडपडतो तो आपला लाडका बाबाच असतो. खरं तर मुलगा आणि वडिलापेक्षा मुलीचं आणि वडिलाचं नातं अधिक घट्ट असतं असे अनेक जण म्हणतात आणि काही अंशी ते खरंही आहे. मुलगी जन्माला येते तेव्हापासूनच तिच्या लग्नाच्या गप्पा सुरू होतात. जिला आपण लाडाने वाढवलं ती एक दिवस नांदायला जाताना आपलं घर सोडून जाणार हे निश्चित असतं आणि यासाठी वडिलांनी आपल्या मनाची तयारीही केलेली असते. मुलीसाठी योग्य वर नि घर निवडणं आणि तिचं कन्यादान करून तिची पाठवणी करणं याबद्दलचे स्वप्न मुलीच्या वाढण्यासोबतच वडिलांच्या डोळ्यात वाढत असते. हे स्वप्न डोळ्यात घेऊन जगणारा आणि ते स्वप्न प्रत्यक्षात उतरत असताना सर्वात जास्त हळवा होणारा माणूस हा मुलीचा बाबाच असतो. आपल्या मुलीची पाठवणी करतांना त्याच्या डोळ्यासमोरून आठवणींचे असंख्य पट सरकत जातात आणि त्या आठवणी डोळ्यांतील आश्रूंद्वारे बाहेरही येतात. प्रत्येक मुलीची आणि वडिलाची गोष्ट ही बहुतेकवेळा अशीच असते. वडिल मुलीच्या काहीशा अशाच नात्याची, त्यांच्या स्वप्नाची आणि तिच्या कन्यादानाची गोष्ट बघायला मिळणार आहे झी मराठीच्या आगामी ‘असे हे कन्यादान’ या मालिकेतून. येत्या शनिवारी २४ जानेवारीपासून सायंकाळी ७.३० वा. ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. मराठी चित्रपट, नाटक आणि मालिका आपल्या दमदार अभिनयाने गाजवणारे अभिनेते शरद पोंक्षे यात वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत तर नवोदित अभिनेत्री मधुरा देशपांडे मुलीच्या भूमिकेत आणि नायकाच्या भूमिकेत प्रसाद जवादे दिसणार आहे.
‘असे हे कन्यादान’ची कथा आहे सदाशिव किर्तने (शरद पोंक्षे) या अतिशय प्रामाणिक आणि शिस्तप्रिय अधिका-याची आणि त्याच्या कुटुंबाची. मुंबईत राहणारे किर्तने हे महानगरपालिकेत उच्च पदावर आहेत. कार्यालयात आपल्या कडक शिस्तीमुळे सर्व कर्मचा-यांमध्ये त्यांचा दरारा आहे. खोटं बोलणं, भ्रष्टाचार, लाचखोरी, वशिलेबाजी या गोष्टींची किर्तनेंना भयंकर चीड आहे. जी शिस्त कार्यालयात तिच घरातही. पत्नी उमा, मुलगी गायत्री आणि मुलगा तेजस असा किर्तनेंचा परिवार. उमा ही गृहीणी तर तेजस आणि गायत्री दोघांचही शिक्षण सुरू आहे. गायत्री कॉलेजला जाते तिला नृत्याची आवड आहे. गायत्री आणि सदाशिवरावांचं नातं खूप हळवं आहे.
सदाशिवराव जेवढे शिस्तप्रिय आहेत तेवढेच प्रेमळ वडिलही आहेत. गायत्रीला काय हवंय नकोय, तिला काय आवडतं काय नाही, तिचे छंद, तिचे हट्ट या सगळ्या गोष्टी त्यांना नीट माहित आहेत. गायत्रीचे सर्व हट्ट आणि लाडही ते पुरवतात पण त्याचीही त्यांची एक वेगळी पद्धत आहेत. मुलांनी एखादी गोष्ट मागितल्यास ती लगेच दिल्यावर त्याची किंमत उरत नाही त्यामुळे योग्य वेळी योग्य गोष्टी द्याव्या असं त्यांचं मत… खरं तर त्यांचे संस्कार आणि शिस्तीमुळे गायत्रीनेही कधीच कोणती वायफळ किंवा अनावश्यक गोष्ट त्यांच्याकडे मागितली नाही. आपल्या वडिलाबद्दल तिच्या मनात प्रचंड प्रेम आणि आदर आहे. ते दोघे जरी एकमेकांचे मित्र नसले तरी आपल्या कोणत्याही मित्र मैत्रिणीपेक्षा आपले बाबा आपल्याला चांगलं समजून घेतात असा विश्वास गायत्रीला आहे. बाबांचा आनंद तोच आपला आनंद असं गायत्री मानते. तिच्यावर आणि तिने घेतलेल्या सर्व निर्णयांवर बाबांनाही विश्वास आहे. आपला प्रत्येक निर्णय ती बाबांनाच विचारून घेते. या परिस्थितीत गायत्रीच्या आयुष्यात कार्तिक येतो. गायत्री कॉलेजच्या एका स्पर्धेत नृत्य करताना कार्तिक तिला बघतो आणि तिच्या प्रेमात पडतो. स्वभावाने “हॅपी गो लकी” असलेला कार्तिक खरं तर मोठा उद्योगपती आहे. त्याचा स्वतःचा मोठा व्यवसाय आहे. पहिल्याच भेटीत गायत्रीच्या प्रेमात पडलेला कार्तिक तिला लग्नाची मागणी घालतो आणि तिथुन तिचं आयुष्य नव्या वळणावर येतं त्याचीच कथा म्हणजे ‘असे हे कन्यादान’ ही मालिका.
या मालिकेत सदाशिवरावांच्या भूमिकेत शरद पोंक्षे आहेत तर गायत्रीची भूमिका मधुरा देशपांडे साकारत आहे. उमाच्या भूमिकेत गायत्री देशमुख आणि कार्तिकच्या भूमिकेत प्रसाद जवादे आहे. याशिवाय मालिकेत तेजस डोंगरे, राधा कुलकर्णी, रूचिका पाटील, सरीता मेहंदळे आणि निनाद लिमये याही कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. शशांक सोळंकी यांच्या सेव्हंथ सेन्स मिडियाची निर्मिती असलेल्या या मालिकेचं दिग्दर्शन गौतम कोळी यांनी केलं आहे. आयुष्याच्या विविध टप्यांवर आपल्या मुलीसाठी कधी मित्र कधी तत्वेता तर कधी मार्गदर्शक बनणा-या बाबाची ही कहाणी ‘असे हे कन्यादान’ मधून प्रेक्षकांच्या भेटीस येतेय २४ जानेवारीपासून दर सोमवार ते शनिवार सायं. ७.३० वा. फक्त झी मराठीवर.