नवी दिल्ली – माजी केंद्रीय मंत्री व राज्यसभेचे खासदार मुरली देवरा यांच्यासह निधन झालेल्या अन्य लोकसभा व राज्यसभा सदस्यांना श्रद्धांजली वाहत आज (सोमवार) पहिल्याच दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.
संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होणार होते. पण, पहिल्याच दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये नुकतेच निधन झालेल्या सदस्यांना व नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्यू झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले. त्यापूर्वी लोकसभा व राज्यसभेत नव्याने निवडून आलेल्या सदस्यांना शपथ देण्यात आली. गोपीनाथ मुंडे यांच्या जागी निवडून आलेल्या त्यांची कन्या प्रीतम मुंडे यांनी मराठीतून शपथ घेतली.
या अधिवेशनामध्ये केंद्र सरकार आपला आर्थिक अजेंडा पुढे करण्याची शक्यता आहे. सरकारच्या या अजेंड्याला विरोधी पक्षांकडून तीव्र विरोध होण्याची शक्यता आहे. केंद्रात सत्तेवर आल्यानंतर नरेंद्र मोदी सरकारचे हे दुसरे मोठे अधिवेशन आहे. मोठ्या प्रमाणावर आर्थिक बदल करणार असल्याचे सरकारने आधीच सूचित केले होते. परकी गुंतवणूकीला परवानगी देणारे प्रलंबित विमा विधेयक आणि वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विधेयक हे सादर करण्याचे सरकारच्या अजेंड्यावर आहे. कोळसा ठराव विधेयकाची जागा घेणारे विधेयक सादर करण्यालाही सरकारचे प्राधान्य असणार आहे. या विधेयकांबाबत दोन्ही सभागृहांमध्ये समान धोरण ठरविण्यासाठी काही आठवड्यांपूर्वीच “जनता‘ पक्षांनी एकत्र बैठक घेतली होती.
संयुक्त जनता दल, राष्ट्रीय जनता दल, धर्मनिरपेक्ष जनता दल आणि समाजवादी पक्षाने सरकारच्या या विधेयकांबाबत समान भूमिका घेण्याचे ठरविले आहे. या पक्षांच्या लोकसभेत एकूण 15, तर राज्यसभेत 25 जागा आहेत. कॉंग्रेसही सरकारच्या विधेयकांना विरोध करण्याची शक्यता आहे.