पहिल्या टिझरपासूनच नेटीझन्समध्ये उत्सुकतेचा विषय बनलेल्या “लोकमान्य -एक युगपुरूष” चित्रपटाने सायबरविश्वात एक नवा विक्रम केला आहे. १५ डिसेंबरला यु ट्युबवर अपलोड झालेल्या या चित्रपटाच्या दुस-या ट्रेलरला अवघ्या अर्ध्या दिवसात दिड लाखांच्या वर हिट्स मिळाल्या आहेत शिवाय हजारो लोकांनी तो फेसबुक आणि ट्विटरवर शेअरही केला आहे. सोशल नेटवर्क साईट्सवर शेअर झालेल्या या ट्रेलरलाही प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून हिट्सचा आकडा दोन लाखांच्या वर पोचला आहे. येत्या २ जानेवारीला प्रदर्शित होणा-या या चित्रपटाची निर्मिती नीना राऊत फिल्मस् ची आहे. चित्रपटात सुबोध भावे लोकमान्यांची मध्यवर्ती भूमिका साकारत असून ओम् राऊतने त्याचं दिग्दर्शन केलं आहे.
मागील आठवड्यात पुण्यातील शनिवारवाड्यावर ‘लोकमान्य – एक युगपुरूष’ चित्रपटाचा ‘फर्स्ट लुक’ हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत लोकार्पित करण्यात आला. त्याआधी चित्रपटाचा एक टिझर युट्युबवर टाकण्यात आला होता ज्यामध्ये लोकमान्यांच्या पूर्ण रुपातील सुबोध आणि त्याचा चेहरा दाखवण्याचं टाळलं होतं. शनिवारवाड्यावर पहिल्यांदाच सुबोध या रुपात प्रेक्षकांसमोर आला आणि प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता अजूनच वाढली. त्यानंतर या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर सुबोध भावेंच्या लोकमान्य रुपासहित आणि संवादासहित युट्युबवर टाकण्यात आला आणि प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. त्यांच्या प्रतिसादाचा हा ओघ अजूनही सूरूच असून आता व्हाट्स अॅपच्या माध्यमातूनही हा ट्रेलर व्हायरल झाला आहे. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे” अशी गगनभेदी घोषणा देणारे टिळक, “कितीही संकटे आली, आभाळ जरी कोसळलं तरी त्यावर पाय ठेऊन मी उभा राहिन” असा जबरदस्त निर्धार करणारे टिळक, चाफेकर बंधूंना प्रेरणा देणारे, आपल्या शाळेत आलेल्या ब्रिटीशांना “डॉग्स अॅंड ब्रिटीश आर नॉट अलाऊड” असे ठणकावून सांगणारे टिळक आणि त्यांचा करारी बाणा या ट्रेलरमधून बघायला मिळतोय. तरुण वर्गाचा या ट्रेलरला प्रचंड प्रतिसाद मिळतोय हे विशेष.
येत्या २ जानेवारीला महाराष्ट्रभरात प्रदर्शित होणारा “लोकमान्य – एक युगपुरूष” हा चित्रपट प्रेक्षकांसाठी नवीन वर्षाची खास भेट असणार आहे. यावर्षी ‘टाइमपास’, ‘फॅंड्री’, ‘लय भारी’,’ डॉ. प्रकाश बाबा आमटे’, आणि ‘एलिझाबेथ एकादशी’ सारखे एकाहून एक हिटच चित्रपट देणा-या एस्सेल व्हिजनच्या माध्यमातून हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.