“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” अशी सिंहगर्जना करून ब्रिटीशांच्या जुलमी सत्तेला हादरवून सोडणारे नेते, भारतीय असंतोषाचे जनक, अभ्यासू पत्रकार, कायदेतज्ज्ञ, थोर समाजसुधारक अशा एक ना अनेक बिरूदावली ज्यांना सन्मानाने आणि आदराने बहाल करण्यात आल्या ते थोर व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य टिळक. कोकणात जन्मलेले बाळ गंगाधर टिळक वयाच्या दहाव्या वर्षी पुण्यात आले. या शहराला आपली कर्मभूमी करत त्यांनी आपल्या प्रखर वाणीने आणि कार्याने भारतीयांच्या मनात देशभक्तीची भावना चेतवली आणि ब्रिटीशांविरूद्धच्या लढ्याला प्रखर बनवत त्यांना सळो की पळो करून सोडलं. ख-या अर्थाने जनसामान्यांचा जहाल नेता असलेल्या लोकमान्यांच्या आयुष्यावर आधारित “लोकमान्य – एक युगपुरूष” हा चित्रपट येत्या २ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा “फर्स्ट लुक” त्यांची कर्मभूमी असलेल्या पुण्यात शनिवारवाड्यावर येत्या ९ डिसेंबरला संध्याकाळी ७ वा. प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. पुण्यातील मान्यवरांच्या उपस्थितीत ‘लोकमान्य – एक युगपुरूष’ चित्रपटाच्या ‘फर्स्ट लुकचे’ अनावरण होत आहे.
महापुरूष कालवश झाले तरी त्यांचे विचार हे कालातीत असतात. हे विचार कधीच मरत नाहीत. काळ कोणताही असो प्रत्येक पिढीसाठी ते विचार तेवढेच महत्त्वाचे असतात. लोकमान्य चित्रपटाची कथा जेवढी टिळकांच्या आयुष्याची आहे तेवढीच ती त्यांच्या विचारांची आहे. त्यांचे विचार हाच या चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे. त्याकाळात टिळकांनी घेतलेली राजकीय आणि सामाजिक सुधारणेबद्दलची भूमिका हा आजही लागू पडते. जुलमी सरकारच्या विरोधात भाषणे आणि अग्रलेखांच्या माध्यमातून जनतेची बाजू मांडणारा आणि ब्रिटीश सरकारला रोखठोक प्रश्न विचारणारा नेता आणि संपादक टिळकांच्या रुपात बघायला मिळाला. आज आपली राजकीय, सामाजिक परिस्थिती नैतिक मूल्यांमध्ये कमालीची ढासळत असतांना टिळकांच्या विचारांची गरज पदोपदी जाणवते. आपण कोणत्याही महापुरुषांना जयंती, पुण्यतिथी, पुतळे आणि तसबिरीतच अडकवून ठेवतो आणि त्यांच्या कार्याला विसरून जातो. नेमक्या याच मनोवृत्तीवर बोट ठेवत आजच्या पिढीचीही भाषा बोलणारा “लोकमान्य-एक युगपुरूष” चित्रपट असणार आहे.
लोकमान्य टिळकांची कर्मभूमी असलेल्या पुण्यभूमीत पुणेकरांच्या साक्षीने लोकमान्य – एक युगपुरूषचे पडघम वाजणार आहेत. यानिमित्ताने पुण्यात पुन्हा एकदा लोकमान्यांची गर्जना घुमणार आहे.
या चित्रपटाची निर्मिती नीना राऊत फिल्म्सची आहे तर दिग्दर्शन ओम राऊत यांनी केलं आहे. यावर्षी ‘टाइमपास’, ‘फॅंड्री’, ‘लय भारी’, ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’, ‘एलिझाबेथ एकादशी’ असे एकाहून एक सरस चित्रपट प्रेक्षकांना देणा-या एस्सेल व्हिजनने या चित्रपटाची सहनिर्मिती केली आहे. एस्सेल व्हिजनच्या माध्यमातून “लोकमान्य – एक युगपुरूष हा चित्रपट येत्या २ जानेवारीला प्रदर्शित होत आहे.