पुणे – “पुणेकरांच्या कराच्या पैशाचे आपण मालक नाही, तर विश्वस्त आहोत, ही जाणीव महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यांनी ठेवावी,‘ असे आवाहन सजग नागरिक मंचने केले आहे. तसेच अनावश्यक महोत्सव किंवा प्रकल्पांवरील आर्थिक उधळपट्टी तातडीने थांबवावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
महापालिकेचे उत्पन्न यंदा घटणार आहे. एकट्या बांधकाम विभागाला अपेक्षित उत्पन्नापेक्षा सुमारे 450 कोटींचा तोटा येणार आहे. त्याचा फटका विकासकामांना बसणार आहे. मात्र तरीही स्थायी समितीने पैसे उधळण्याचा सपाटा लावला आहे. आधी महिला व यूथ महोत्सवासाठी 30 लाख व ऐतिहासिक वास्तू फलकांसाठी 57 लाखांची तरतूद केली आहे. गरज नसलेल्या अशा कामांवर उधळपट्टी करण्याचे निर्णय स्थायी समिती घेत आहे. एकीकडे अपेक्षित उत्पन्न मिळत नाही म्हणून मालमत्ताकर व पाणीपट्टीत वाढ करण्याचा प्रस्ताव आणायचा आणि दुसरीकडे ही उधळपट्टी करायची, असा महापालिकेचा कारभार सुरू आहे. त्यावर कोणाचाही अंकुश नाही, ही दुर्दैवाची बाब असल्याचे मंचचे विवेक वेलणकर आणि विश्वास सहस्रबुद्धे यांनी निवेदनात म्हटले आहे.