लक्ष्मण जगताप यांनी १०० दिवसात ३/४ पक्ष बदलले , पक्षाने मोठ्ठी ताकद देवूनही असे वागणाऱ्या उमेदवारांना मतदारहि आता वाऱ्यावर सोडतील अशी टीका करतानाच त्यांचा प्रचार करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाही माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ‘ खबरदार, माझ्याशी गाठ आहे ‘ असा इशारा दिला
पिंपरी – ‘पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीनही मतदारसंघांत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्याच उमेदवारांचा प्रचार करा. कोणी गडबड केली, गद्दारी केली आणि दिवसा एक व रात्री एक असे करणार असाल तर गाठ माझ्याशी आहे. ज्यांना पक्ष बदलायचाय त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा,‘‘ अशा कठोर शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आजी-माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना सुनावले. लक्ष्मण जगताप यांच्या भाजपतील प्रवेशावर पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले, ‘शंभर दिवसांच्या आत तीन-तीन, चार-चार पक्ष बदलणाऱ्या व्यक्तींवर जनता विश्वास ठेवत नाही. पक्षाने त्यांना एवढी मोठी ताकद दिली असताना ते पक्षाला अशा पद्धतीने सोडत असतील, तर ते मतदारांनाही वाऱ्यावर सोडायला मागे-पुढे पाहणार नाही.
चिंचवड मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी रहाटणीत आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. “पिंपरी‘साठी आकुर्डीतील हॉटेलमध्ये आणि “भोसरी‘साठी मोशीतील हॉटेलमध्ये बैठक झाली. भारतीय जनता पक्षातर्फे चिंचवड मतदारसंघातून लक्ष्मण जगताप रिंगणात आहेत. राष्ट्रवादीतील त्यांचे समर्थक नगरसेवकही या बैठकीला आवर्जून उपस्थित होते. आमदार जगताप समर्थक राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील पदाधिकारी, तसेच कार्यकर्ते “कमळा‘चा प्रचार करत असल्याच्या तक्रारी पवार यांच्या कानावर होत्या. पक्षाची पदे लाटून बंडखोरांचा प्रचार करणाऱ्यांमुळे लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेला होईल, अशी भीती राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्याने पवार यांनी सर्वांनाच सुनावले. महापौर शकुंतला धराडे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, शहराध्यक्ष योगेश बहल, महिला आघाडीच्या अध्यक्षा सुरेखा लांडगे, महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम, माजी महापौर अपर्णा डोके, ज्येष्ठ नगरसेविका झामाबाई बारणे, शमीम पठाण, नगरसेवक रामदास बोकड, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल कलाटे उपस्थित होते.
ते म्हणाले, ‘गेल्या वेळी तुम्ही अपक्षांना निवडून आणले. या वेळी तसे चालणार नाही. दिवसा एक, रात्री एक हे आता खपवून घेतले जाणार नाही. पक्षाशी गद्दारी करायचीच असेल, तर नगरसेवकपदाचे राजीनामे द्या, अन्यथा आम्हाला पदे देता येतात, ती काढूनही घेता येतात. जो काम करेल त्याला मी ताकद देईन, पण राष्ट्रवादीशिवाय दुसरा विचार कोणी करू नये. पक्षामुळे तुम्हाला आणि मला किंमत आहे, हे विसरू नका.‘‘