अमरावती : गरीब, गरजू आणि पीडित रूग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी शासकीय रूग्णालयात येतात. त्यांची डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांनी मनापासून सेवा करावी, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले.
युवा चेतना दिनानिमित्त जिल्हा सामान्य रूग्णालयात आयोजित एड्स जनजागृती कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री बोलत होते. यावेळी त्यांनी युवाचेतना रथाला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. आरोग्य उपसंचालक डॉ. अविनाश लव्हाळे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अरूण राऊत, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेचे सहसंचालक डॉ. मुकूंद डिग्गीकर आदी यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले, एड्स रुग्णाकडे पाहण्याचा दृष्टीकोन सहानुभूतीचा असावा, तसेच ह्या रूग्णांची योग्य काळजी घ्यावी. त्यांना प्रेमाची वागणूक द्यावी. एड्स निर्मूलन हा समाजासाठी महत्त्वाचा कार्यक्रम आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना प्रवृत्त करावे.
युवा चेतना दिनानिमित्त विद्यार्थिनींनी पथनाट्य सादर करून एड्स रूग्ण व त्यांच्या संततीचा करण्यात येणारा तिरस्कार याबाबतच्या वस्तुस्थितीचे दर्शन घडविले. याप्रसंगी पालकमंत्र्यांनी सर्व उपस्थितांना एड्स संरक्षण व सुरक्षेसंबंधीची शपथ दिली. कार्यक्रमास जिल्हा रूग्णालय, सुपरस्पेशालिटी हॉस्पीटलचे डॉक्टर्स, कर्मचारी व एड्स नियंत्रण संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. उपस्थितांचे आभार अजय साखरे यांनी मानले.

