पुणे :नऊ वर्षांच्या मुलीची हृदयाची शस्त्रक्रिया करताना तिला भूल देण्याच्या औषधाचा जास्त डोस देण्यात आल्यामुळे तिला कायमचे अंधत्व आणि अपंगत्व आले. याप्रकरणी ग्रँट मेडिकल फाउंडेशनच्या रुबी हॉल क्लिनिक, शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर या तिघांनी मुलीला साडेअकरा लाखांची नुकसानभरपाई द्यावी असा आदेश पुणे जिल्हा ग्राहकमंचाने दिला आहे. मंचाचे अध्यक्ष व्ही. पी. उत्पात, मोहन पाटणकर आणि क्षितिजा कुलकर्णी यांच्या मंचाने हा निकाल दिला.
याप्रकरणी संतोष जगदाळे (रा. ओझर) यांनी मंचाकडे तक्रार दाखल केली होती. त्यांनी ग्रँट मेडिकल फाउंडेशनचे रुबी हॉल क्लिनिक, डॉ. अन्वय मुळे, डॉ. स्वामी मोहन यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. जगदाळे यांची नऊ वर्षांची मुलगी उर्मिला हिला छातीत दुखू लागल्याने तिला १८ डिसेंबर २00८ ला रुबी हॉल क्लिनिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे डॉ. मोहन यांनी तिला शस्त्रक्रिया करण्याआगोदर भूल दिली. यानंतर उर्मिला पंधरा दिवस झाले तरीही शुद्धीवर आली नव्हती. शुद्धीवर आली तेव्हा तिला तिची दृष्टी कमी झाल्याचे जाणवले.
यानंतर उर्मिलाचे वडील जगदाळे यांनी तिला मुंबईच्या वाडिया हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. तिथे तिची तपासणी केली असता ऑपरेशन करताना प्रमाणाबाहेर भुलीचा डोस दिल्याने व ऑपरेशन व्यवस्थित न केल्याने तिची तब्येत खराब झाल्याचे आढळले. तिच्या उपचारासाठी जगदाळे यांना त्यावेळी साडेतीन लाख रुपये खर्च आला. परंतु दृष्टी गेल्यामुळे आणि अपंगत्व आल्यामुळे नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी तक्रारदाराने मंचाकडे केली होती.