पुणे – ‘रुपी बॅंकेची जबाबदारी कॉसमॉसने घ्यावी,‘ असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केले. काही तांत्रिक अडचणी असल्यास दूर करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री आणि रिझर्व्ह बॅंकेशी चर्चा करू, असेही त्यांनी सांगितले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रस्त्यावर उभारलेल्या कॉसमॉस बॅंकेच्या इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी महापौर दत्तात्रेय धनकवडे, समाज कल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे,
खासदार अनिल शिरोळे, बॅंकेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उपाध्यक्ष मिलिंद काळे आणि संचालक डॉ. मुकुंद अभ्यंकर आदी मान्यवर उपस्थित होते.
रुपी बॅंकेचे पुनरुज्जीवन करावे, अशी लोकांची अपेक्षा आहे. त्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले,””कॉंसमॉस बॅंकेने आतापर्यंत पंधरा सहकारी बॅंकांचे यशस्वीरीत्या विलीनीकरण केले आहे. रुपीचीही जबाबदारी त्यांनी घेऊन सोळावी बॅंक विलीनीकरण करून गौरवशाली परंपरा पुढे सुरू ठेवावी. येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्याचा प्रयत्न सरकार करेल.
सहकार हा संस्कार आहे. त्यामुळे विश्वस्तांच्या भावनेतून काम केले पाहिजे. कॉसमॉस त्या भावनेतून काम करीत आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, ‘सहकारी बॅंकांचे नागरिकांशी जवळचे संबंध असतात. राज्यात 60 टक्के बॅंका या तीनच जिल्ह्यांत आहेत. त्यामुळे त्या भागाचा विकास झाला आहे. पन्नास टक्के नागरिकांची बॅंक खाती नाहीत. त्यामुळे या क्षेत्राचा विस्तार होण्याची गरज आहे. बॅंक नसल्यामुळे शेतकऱ्यांना खासगी सावकाराची मदत घ्यावी लागते. त्यातून आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. बॅंकांनी कार्यपद्धतीत फेरविचार करण्याची गरज आहे.‘‘