पुणे :
खासदार राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी पक्ष, रामदास आठवले यांचा रिपाई (ए), कपिल पाटील यांचा लोकभारती, विनय कोरे यांचा जनसुराज्य शक्ती यांच्यासह 16 पक्षांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे, परंतु यामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष नसून त्याची मान्यता रद्द झालेली नाही, अशी माहिती प्रदेश प्रवक्ते दीपक बिडकर यांनी दिली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लढविण्यासाठी आयोगाकडे नोंदणी करणे राजकीय पक्ष आणि आघाड्यांना बंधनकारक आहे. राज्य निवडणूक आयोगाकडे मोठ्या-लहान असे राजकीय पक्ष आणि आघाड्या अशा 300 पक्षांची नोंदणी आहे. त्यापैकी सन 2005 मध्ये नोंदणी केलेल्या राजकीय पक्षांचा आयोगाने आढावा घेतला आणि 16 पक्षांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे, परंतु यामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष नसून त्याची मान्यता रद्द झालेली नाही, अशी माहिती प्रदेश प्रवक्ते दीपक बिडकर यांनी दिली.
माध्यमांकडून विचारणा झाल्यामुळे हा खुलासा पक्षाच्या वतीने प्रदेश प्रवक्ते दीपक बिडकर यांनी केला आहे.
सन 2005 मध्ये नोंदणी केलेल्या राजकीय पक्षांचा आयोगाने आढावा घेतला असता, नोंदणीकृत राजकीय पक्षांनी दरवर्षी द्यावयाचे वार्षिक लेखापरीक्षित लेख्याची व आयकर विवरणाची (रिटर्न) प्रत राज्य निवडणूक आयोगास सादरच केली नसल्याचे आढळून आले होते. त्याप्रकरणात आयोगाने जुलैमध्ये 19 पक्ष- आघाड्यांंविरोधात कारवाईचा बडगा उगारत मान्यता का रद्द करू नये, अशा नोटीसा बजावल्या होत्या. त्यानुसार या पक्षांनी आयोगाच्या नोटीसाला उतर दिले. मात्र त्यातून आयोगाचे समाधान झाले नाही किंवा काही पक्षांनी माहितीच दिलेली नाही अशा 16 पक्षांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. त्यामध्ये खासदार राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी पक्ष, रामदास आठवले यांचा रिपाई (ए), कपिल पाटील यांचा लोकभारती, विनय कोरे यांचा जनसुराज्य शक्ती यांच्यासह ऑल इंडिया क्रांतीकारी काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय स्वदेशी काँग्रेस पक्ष, इंडियन मुस्लिम काँग्रेस पार्टी, मागासवर्गीय जनशक्ती पार्टी, राष्ट्रवादी जनता पार्टी, प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी, सत्यशोधक समाज पक्ष, शिवराज्य पक्ष, रिपाई (डेमोक्रॅटिक), महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस, रिपब्लिकन पक्ष (खोरीपा), जनशक्ती आघाडी पेण यांचा समावेश आहे.