महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी परिवहन भवनस्थित पर्यटन मंत्रालयात डॉ.शर्मा यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत भारतीय पुरातत्व विभागाचे महासंचालक डॉ. राकेश तिवारी उपस्थित होते. बैठकीत श्री. तावडे यांनी महाराष्ट्र शासनाच्यावतीने रायगड किल्ल्यावर होऊ घातलेल्या ‘रायगड महोत्सवासाठी’ भारतीय पुरातत्व खात्याकडून आवश्यक परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली. श्री. तावडे यांनी रायगड महोत्सवाची कल्पना व त्यासंबंधीच्या नियोजनाबाबत सविस्तरपणे माहिती दिली. रायगडावर शिवकालीन वातावरण तयार करण्यात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या सक्षम नेतृत्वातील महाराष्ट्राचे वैभव याठिकाणी प्रत्यक्ष साकार करण्यात येणार असल्याचे श्री. तावडे यांनी सांगितले.
डॉ.शर्मा यांनी पुरातत्व खात्याच्या अधिन राहून रायगड महोत्सवाला आवश्यक मंजुरी देण्यात येईल, अशी ग्वाही दिली. महाराष्ट्र शासनातर्फे देशात प्रथमच अशा पद्धतीचा महोत्सव साजरा करण्यात येणार असून भारतीय इतिहास व ऐतिहासिक वास्तूंची गौरवशाली परंपरा सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले. आपण स्वत: या महोत्सवाला उपस्थित राहू असे आश्वासनही डॉ.शर्मा यांनी दिले.
रायगड महोत्सव साजरा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अर्थसंकल्पात 10 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यावर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये साजरा होणाऱ्या रायगड महोत्सवात शिवकालीन वातावरण प्रत्यक्षात उभे करण्यात येईल आणि देशात अशा पद्धतीचा महोत्सव साजरा करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार असल्याचे श्री. तावडे यांनी सांगितले. भारतीय पुरातत्व खात्याकडून आवश्यक असणाऱ्या विविध परवानग्यांसह केंद्र सरकारकडून आवश्यक असणारी सर्वतोपरी मदत करण्यात येणार असल्याची ग्वाही डॉ.शर्मा यांनी या बैठकीत दिली असल्याची माहिती श्री. तावडे यांनी दिली.