अलिबाग : शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे आयोजित रायगड महोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रायगड किल्ल्यावरील राणीवसा, पालखी दरवाजा, होळीचा माळ, बाजारपेठ, जगदिश्वराचे मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी, नगारखाना, राजसदर येथील मेघडंबरी या स्थळांना भेट दिली.
यावेळी त्यांच्यासमवेत केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गिते, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री प्रकाश महेता, आमदार सर्वश्री सुनील तटकरे, भरत गोगावले, प्रशांत ठाकूर, कला दिग्दर्शक नितिन देसाई तसेच वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी व राजसदर येथील सिंहासनाधिष्ठीत पुतळ्यास पुष्प वाहून आदरांजली वाहिली. राजसदर येथे मुख्यमंत्र्यांसमोर छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याची भव्य व अत्यंत देखणी पुनरावृत्ती सादर करण्यात आली.
जवळपास दीड तास मुख्यमंत्र्यांनी शिवरायांच्या कालखंडातील इतिहास अनुभवला. छत्रपतीच्या काळातील पारंपरिक टाळनृत्य, दांडपट्टा, कसरतीचे मर्दानी खेळ, ढोल, ताशे, टाळ यांच्या गजराने किल्ल्यावर शिवकालिन इतिहास जिवंत करण्यात आला होता.
रायगड महोत्सवाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील समग्र जनजीवन व स्मृती जिवीत करण्याचे काम झाले आहे. शिवरायांच्या काळात रायगड कसा होता याचे साक्षात रुप येथे साकारण्यात आले आहे. याचा आनंद व समाधान वाटत असल्याचे मनोगत मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केले. महाराजांचा वैभव काळ यामुळे दृष्टीस येतो व इतिहासाला उजळणी मिळते. महाराजांचे नियोजन, दूरदृष्टी, स्थापत्यशास्त्र तसेच गतकालिन संस्कृती आदी बाबींची जाणीव व माहिती नव्या पिढीला या महोत्सवामुळे होईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.