पुणे -धनकवडीतील बालाजीनगर येथील वाहनांच्या जाळपोळी पाठोपाठ पंधरा दिवसांतच चव्हाणनगर परिसरात एका अज्ञाताने रविवारी पहाटे रस्त्याकडेला उभ्या केलेल्या वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली. रिक्षा, मिनी बस, मोटारी व स्कूल व्हॅन अशा चौदा वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत.सहकारनगरकडून तीनहत्ती चौकातून धनकवडीकडे जाणाऱ्या चव्हाणनगरच्या मुख्य मार्गावर ही घटना घडली आहे. या मार्गाच्या कडेला रात्री दुतर्फा वाहने उभी केली जातात. रविवारी पहाटे पावणे तीन वजण्याच्या सुमारास मोठ्या आवाजाने नागरिक जागे झाले.
काहीजण धाडसाने बाहेर आले तेव्हा त्यांना तोंडाला रुमाल बांधलेला आणि हातात लोखंडी गज घेवून धावत असलेला तरुण दिसला. त्याचा पाठलाग केल्यानंतर तो शांतीनगरच्या बाजूने पळून गेला. दरम्यान, झांबरे पॅलेस समोरील या मार्गाकडेला दुतर्फा उभ्या असलेल्या वाहनांच्या काचा फोडल्याचे नागरिकांना निदर्शनास आले. नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिस आल्यानंतर त्यांनी शांतीनगर परिसरात शोधाशोध केली मात्र तो अज्ञात तरुण पळून जाण्यात यशस्वी ठरला. या घटनेत तीन रिक्षा, दोन प्रवाशी मिनीबस, दोन स्कूल व्हॅन, दोन साध्या व्हॅन, पाच मोटारींचे काचा फोडून नुकसान करण्यात आले आहे. सहकारनगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत शिंदे, बाळकृष्ण अंबुरे यांच्यासह उप आयुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी पहाटेच घटनास्थळी येवून माहिती घेतली. अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उप निरीक्षक ए. बी. जगताप करत आहेत.