पुणे- चांगल्या वाईट अशा साऱ्या इतिहासाची साक्षीदार असलेली तब्बल सव्वाशे वर्षे जुनी असलेली पुण्यातील मंडई रात्री रंगीबेरंगी दिव्यांच्या झगमगाटाने उजळून निघाली .
महापालिकेतर्फे “मंडई‘च्या नूतनीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यानुसार “मंडई‘वरील आकर्षक प्रकाशयोजनेचे उद्घाटन महापौर दत्तात्रेय धनकवडे यांच्या हस्ते रविवारी झाले. त्यानंतर “मंडई‘चे बदललेले रूप अनेकांना आपल्या डोळ्यांत साठवता आले. या वेळी उपमहापौर आबा बागूल, “अखिल मंडई मंडळा‘चे अण्णा थोरात, माजी महापौर मोहनसिंग राजपाल, सभागृह नेते शंकर केमसे, नगरसेविका रूपाली पाटील, नगरसेवक दिलीप काळोखे, अशोक येनपुरे आदी उपस्थित होते.”पुणे टुरिस्ट हब‘अंतर्गत “मंडई‘च्या दुरुस्तीची कामे यंदा प्रथमच हाती घेण्यात आली. या अष्टकोनाकृती इमारतीवरील कौले बदलण्यात आली आहेत. स्पेनमधील हर्मनोस डियाज रेडोन्डो ग्रुप या कंपनीतून मूळ दर्जाशी साधर्म्य साधणारी कौले मिळाल्याने मंडईच्या इमारतीची शोभा आणखी वाढली आहे. याबरोबरच कौलांच्या ठिकाणी रंग बदलणारे आकर्षक एलईडी दिवे (मल्टिकलर लायटिंग) लावण्यात आले आहेत, त्यामुळे ही वास्तू झगमगली आहे. टोल वाजविणाऱ्या शाळकरी मुलाची प्रतिकृती आणि घड्याळाचे लोकार्पणही या वेळी करण्यात आले.