परप्रांतीयांना महाराष्ट्रात नो एन्ट्री ची गर्जना करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची १० ऑक्टोबर रोजी पुण्यात सभा होणार आहे. यापूर्वी ही सभा एस. पी. कॉलेजच्या मैदानात होईल, असे सांगण्यात आले होते. त्यासाठी पक्षाने एस. पी. कॉलेजकडे तशी परवानगी मागितली होती. राज ठाकरे यांची सभा एस. पी. कॉलेजमध्येच व्हावी, यासाठी पक्षाचे वरिष्ठ नेते आग्रही होते. तर ही सभा नदीपात्रातच व्हावी, यासाठी पक्षाचे कार्यकर्ते आग्रही होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील सभा एस. पी. कॉलेजच्या मैदानाऐवजी आता नदीपात्रात होणार आहे. मध्यवर्ती ठिकाण, पार्किंगची सोय म्हणून नदीपात्रात सभा घेण्याचा निर्णय झाल्याचे समजते.
यापूर्वी राज ठाकरे यांच्या नदीपात्रात झालेल्या सभांना मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. तसेच त्याचे काही प्रमाणात मतदानातही रूपांतर झाले होते. त्यामुळे नदीपात्रातील मैदान पक्षासाठी ‘लकी’ आहे, असा कार्यकर्त्यांचा समज आहे.
‘नदीपात्र हे शहरातील मध्यवर्ती ठिकाण आहे. त्याचा अनेक मतदारसंघातील मतदारांवर प्रभाव पडतो. यापूर्वी राज ठाकरे यांच्या सभा यशस्वी झाल्या आहेत. तसेच येथे पार्किंगला फारशी अडचण येत नाही.एस. पी. कॉलेजच्या मैदानावर सभा घेतल्यास ती आतील बाजूस होते, तसेच तिथे पार्किंगलाही अडचण येते. त्यामुळे नदीपात्रातच ही सभा व्हावी, यासाठी पक्षाचे कार्यकर्ते आग्रही होते. त्यानुसार आता ही सभा नदीपात्रात घेण्यात येणार आहे. एस. पी. कॉलेजमध्ये सभा घेतल्यास आर्थिक गणितासह अन्य काही समीकरणे बदलण्याची शक्यता होती. त्या पार्श्वभूमीवर नदीपात्रच योग्य असल्याचा निर्णय अंतिम करण्यात आला.
दहा ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता नदीपात्रात राज ठाकरे यांची सभा होणार असून त्यासाठी सर्व परवानग्या मिळाल्या आहेत, असे पक्षाचे शहराध्यक्ष बाळा शेडगे यांनी सांगितले.