अलिबाग – राज्यातील जनतेने भाजप-सेना या विरोधी पक्षांना स्थिर सरकारसाठी मतदान केले मात्र त्यांच्यात एकत्र येण्याचे धाडस नाही. यामुळे सध्या राज्यातील राजकारणात दीर्घकालीन स्थैर्याची स्थिती दिसत नाही. अशा स्थितीत राज्यात पुन्हा केव्हाही निवडणुका होऊ शकतात तेव्हा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उद्यापासून पक्षबांधणीच्या कामाला लागावे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी राज्यात मध्यावधी निवडणुकीचे संकेत दिले.आहे.त्याचबरोबर एमआयएम या कट्टरवादी पक्षाच्या वाढत्या प्रभावावर बोलताना पवारांनी भाजपलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. भाजपमधील एक गट एमआयएमला प्रोत्साहन देत असल्याचा गंभीर आरोप पवार यांनी केला. या दोघांमुळे सामाजिक सलोखा बिघडू शकतो, असेही पवार म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन दिवसीय चिंतन शिबीर आजपासून अलिबागमध्ये सुरू झाले. या शिबीराला पक्षाचे महत्त्वाचे 200 ते 250 नेते व पदाधिकारी उपस्थित आहेत. यावेळी ‘वेध भविष्याचा’ या चर्चासत्रात शरद पवार बोलत होते. शरद पवारांनी मार्गदर्शन करताना सध्याची राजकीय स्थिती व पक्षाने पुढे कसे काम करावे याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले.
पवार म्हणाले, नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्या पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. निकालाचा टक्का वाढला पण आपल्या पक्षाला अपेक्षित मतदानाची टक्के वाढल्याची दिसून आली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला चौथ्या क्रमांकाची मते मिळाली. 17.5 टक्के आपल्याला मिळाली असली तरी काँग्रेसला 18 व शिवसेनेलाही 20 टक्क्यांच्या आतच मते मिळाली आहेत. भाजपला एका विशिष्ट परिस्थितीत यश मिळाले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला दमदार यश मिळाले त्याचा परिणाम विधानसभेतही दिसून आला. याचबरोबर आपल्या पक्षाने केवळ 130 जागांचीच तयारी केली होती. जागावाटपाचा पेच न सुटल्याने आपल्याला अनपेक्षित सर्व जागा लढाव्या लागल्या. स्वतंत्र निवडणुका लढण्याचे जसे तोटे झाले तसा फायदाही झाला. पक्षाला 41 जागावर विजय मिळाला तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 56 जागांवर दुस-या क्रमांकावर तर 51 जागांवर तिस-या क्रमांकावर आहे. यातून एक आकडेवारी दिसून येते की 148 जागा जिंकण्याची आपली क्षमता आहे. पक्षाचा पराभव का झाला याचे चिंतन केले पाहिजे. सत्ताधारी काँग्रेस पक्षांसह विरोधी पक्षाने राष्ट्रवादीबाबत मतदारांत संभ्रम निर्माण केला. त्याचा फटका आपल्याला बसला. पण निवडणुकांत विजय-पराजय होतच राहतात. मात्र आपल्या कार्यकर्त्यांना विश्वास दिला पाहिजे व ताकद दिली पाहिजे व जनतेच्या हिताला प्राधान्य दिले पाहिजे असे पवारांनी सांगितले.