ग्वांगडांग प्रांताचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांची भेट : महाराष्ट्र आणि ग्वांगडाग प्रांतामध्ये होणार औद्योगिक करार
मुंबई : देशात आणि विशेषत: राज्यात उद्योग उभारणीसाठी पोषक वातावरण आहे. राज्यात माहिती तंत्रज्ञान, औद्योगिक क्षेत्र विकास, विविध उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी ग्वांगडांग प्रांतातील विविध कंपन्या उत्सुक असून त्यांना शासन संपूर्ण सहकार्य करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे चीन येथील ग्वांगडांग प्रांताचे राज्यपाल झ्यू शिउडान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची येथे भेट घेतली, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, अतिरिक्त मुख्य सचिव (नियोजन) सुनिल पोरवाल, राजशिष्टाचार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुमित मल्लिक, वित्त विभागाचे प्रधान सचिव (व्यय) सीताराम कुंटे, एमआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, पर्यटन सचिव श्रीमती वल्सा नायर सिंह, उद्योगपती सर्वश्री दिलीप पिरामल, सचिन जिंदल, निखिल गांधी, निरंजन हिरानंदानी, बिपीन चंद्रानी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात विविध क्षेत्रात गुंतवणूक करण्यास ग्वांगडांग प्रांतातील विविध कंपन्या उत्सुक आहेत. राज्याचे आणि ग्वांगडांग प्रांताचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी कंपन्यासमवेत करार करणे आवश्यक आहे व त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.
राज्यपाल झ्यू शिउडान म्हणाले, भारत देशाच्या आर्थिक विकासात महाराष्ट्राचे मोलाचे योगदान आहे. महाराष्ट्र हे आर्थिक विकासाचे मॉडेल आहे व राज्याच्या औद्योगिक व आर्थिक विकास व्हावा यासाठी ग्वांगडांग प्रांतातील जवळजवळ ३० कंपन्या गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत. त्यासाठी राज्य सरकारने सहकार्य करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या बैठकीदरम्यान ग्वांगडांगच्या राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना ग्वांगडांग येथे येण्याचे निमंत्रण दिले.