पुणे :
‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस’च्या सुसज्ज ‘डायल 108’ सेवेच्या रूग्णवाहिकेमध्ये राज्यातील 5 हजार 851 प्रसुती होऊन बालकांचा जन्म झाला आहे. दिनांक 28 नोव्हेंबर 2015 पर्यंतच्या तपशीलानुसार ही आकडेवारी आहे. ‘बाळंतपणाच्या कळा सुरू होणार असे वाटल्यानंतर रूग्णवाहिका बोलावण्यास उशीर केला जाऊ नये आणि लवकर मदत मिळून मातामृत्यू व अर्भक मृत्यू टाळता यावेत’ यासाठी ‘डायल 108’ रूग्णवाहिका वरदानच ठरत असल्याचे प्रसुत महिलांनी म्हटले आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडीकल सर्व्हिस’चे मुख्य संचालन अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांनी दिली.
दिनांक 28 नोव्हेंबर 2015 ‘डायल 108’ रूग्णवाहिकेत झालेल्या प्रसुतीची जिल्हानिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे अहमदनगर (262), अकोला (134), अमरावती (144), औरंगाबाद (320), बीड (332), भंडारा (49), बुलढाणा (191), चंद्रपूर (135), धुळे (112), गडचिरोली (109), गोंदीया (63), हिंगोली (143), जळगांव (135), जालना (142), कोल्हापूर (166), लातूर (233), मुंबई (60), नागपूर (162), नांदेड (205), नंदूरबार (140), नाशिक (337), उस्मानाबाद (175), परभणी (137), पुणे (385), रायगड (58), रत्नागिरी (48), सांगली (139), सातारा (264), सिंधुदूर्ग (19), सोलापूर (367), ठाणे (175), वर्धा (64), वाशिम (99), यवतमाळ (181), पालघर (166).
‘108’ हा दूरध्वनी डायल केल्यानंतर ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडीकल सर्व्हिस’च्या सुसज्ज रुग्णवाहिका मदतीला येतात. अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशा 937 रुग्णवाहिका राज्यभर आहेत. या रूग्णवाहिकेमध्ये 233 ‘अॅडव्हान्स लाईफ सपोर्ट’ रूग्णवाहिका असून, 704 ‘बेसिक लाईफ सपोर्ट’ रूग्णवाहिका आहेत.
दि.26 जानेवारी 2014 रोजी सुरू झालेल्या या अत्याधुनिक वैद्यकीय सेवेसाठी ‘108’ या दूरध्वनी क्रमांकावर डायल केल्यास सुसज्ज रुग्णवाहिका डॉक्टरांसह येते. ‘अपघात’, ‘जळीत’, ‘विषबाधा’, ‘हदयविकार’, ‘अर्धांगवायू’ अशा कोणत्याही आपत्कालिन गोष्टीत दूरध्वनी केल्यास ही रुग्णवाहिका वैद्यकीय मदत पुरवते आणि नजिकच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था करते.

