पुणे-शिवसेनेचे ताथवडे-पुनावळे विभागप्रमुख राजेश ऊर्फ राजू सखाराम दर्शले यांचा खून प्रकरणी मुख्य आरोपी सचिन कुदळे याच्यासह त्याच्या दोन साथीदारांना कर्नाटकातील गुलबर्गा येथे अटक करण्यात आली आहे . त्यांच्याकडून दोन पिस्तूल ताब्यात घेण्यात आले आहेत. पूर्वीच्या प्रेमसंबंधास विरोध केल्याने कुदळे याने दर्शले यांचा खून केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. असे हिंजेवाडी पोलिसांचे म्हणणे आहे
सचिन सुदाम कुदळे (वय ३१, रा. माळवाडी-पुनावळे), शाहरूख ऊर्फ पाप्या रशिद शेख (वय २०, रा. भेलकेवाडी, भोर) आणि गौतम श्रीराम मोरे (वय ३३, रा. नेहरूनगर, विठ्ठलगनर, पिंपरी) अशी अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींची नावे आहेत. दर्शले यांच्या खुनामध्ये प्रत्यक्ष सहभागी असलेले मोहन ऊर्फ बाबु जनार्दन मुजुमले (रा. जमदाडे चाळ, भुजबळवस्ती, वाकड) आणि प्रकाश डोंगरे (रा. डिलक्स टॉकिजजवळ, पिंपरी) या दोन आरोपींना लवकरच पकडण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.
शिवसेनेचे ताथवडे-पुनावळे विभागप्रमुख राजेश दर्शले यांचा १८ ऑक्टोबर रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास पुनावळे-जांबे रस्त्यावरील ईस्टेरा या बांधकाम साईटवर गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर पोलिसांनी तेथे लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमधील फुटेज तपासले होते. त्यामध्ये भोर येथील गुन्हेगारी प्रवृत्तीचा शाहरूख ऊर्फ पाप्या शेखला पोलिसांच्या खबऱ्याने ओळखले. त्यानंतर पोलिसांना शाहरूखबद्दल अधिक माहिती घेतली असता तो , सचिन कुदळे आणि त्याचा मित्र आदर्श खुनाच्या घटनेच्या अगोदर व घटनेच्या दिवशी पुनावळे परिसरात आले असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. तसेच सचिन कुदळे हा एका खुनाच्या गुन्ह्यांमध्ये जेलमध्ये असताना मित्र आदर्शमुळे आरोपी शाहरूखबरोबर त्याची ओळख झाल्याचे पोलिसांच्या तापासात निष्पन्न झाले.
त्यानंतर पोलिसांनी भोरमध्ये जाऊन आरोपी शाहरूखची माहिती घेतली असता तो तेथे नसल्याचे व काळ्या रंगाची पल्सर मोटारसायकल वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याचा बीड, उस्मानाबाद, सातारा, वाई, पंढरपूर व सोलापूर येथे शोध घेतला. मात्र तो कर्नाटकातील गुलबर्गा येथे गेल्याची माहिती खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने गुलबर्गा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सापळा रचून सचिन कुदळे, शाहरूख ऊर्फ पाप्या शेख आणि गौतम मोरे या तिघांना पकडले. या तिघांचीही झडती घेतली असता त्यांच्याकडे दोन पिस्तुल मिळाले.
या आरोपींच्याकडे अधिक चौकशी केली असता सचिन कुदळे याच्या सांगण्यावरून शाहरूख ऊर्फ पाप्या शेख, प्रकाश डोंगरे, बाबु मुजुमले या तिघांनी कट रचून शिवसेनेचे विभागप्रमुख राजेश दर्शले यांचा गोळ्या झाडून खून केल्याची कबुली दिली आहे. राजेश दर्शले यांनी पूर्वीच्या प्रेमसंबंधास विरोध केल्याने तसेच गावातील जमिनी बांधकाम व्यावसायिकांना विकसित करण्यास दिल्यामुळे व माथाडी कामगारांची कामे मिळू दिली नाहीत म्हणून त्याचा राग मनात धरून कुदळे यांनी त्यांचा खून केल्याचे तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी कुदळे याच्यासह शाहरूख शेख, मोहन मुजुमले व प्रकाश डोंगरे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक विश्वजित खुळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दर्शले यांच्या खुनातील आरोपींना पकडले.