पुणे- राजा परांजपे यांच्या नावाने मिळणारा पुरस्कार हा माझ्या आयुष्यातील आनंदयोग आहे. राजा परांजपे ही व्यक्ती
नव्हती तर ती मराठी चित्रपट सृष्टीसाठी एक संस्था होती अशा शब्दांत जेष्ठ कलावंत दिलीप प्रभावळकर यांनी आपल्या
भावना व्यक्त केल्या.
राजा परांजपे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित राजा परांजपे महोत्सवाचा समारोप समारंभ भरत नाट्यमंदिर येथे पार
पडला. जेष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांच्या हस्ते दिलीप प्रभावळकर यांना यावेळी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित
करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भारत देसडला,प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अर्चना राणे, खजिनदार अजय राणे
हे व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रभावळकर म्हणाले, राजा परांजपे यांनी मराठी चित्रपट सृष्टीला एक दिशा दिली. नैसर्गिक अभिनय शैली शाळेचे ( स्कूल
ऑफ नॅचरल अॅक्टिंग) ते शिक्षक होते. ते अगदी सहज बोलायचे. त्यांचा अभिनयही सुंदर असायचा. त्यांनी विविध
सिनेमांमधून विविध विषय हाताळले. विविध विषय हाताळण्यावर त्यांची हुकुमत होती. त्यामुळे त्यांची प्रत्येक कलाकृती
ही आजची ताजी कलाकृती वाटते. मुकचित्रपटापासून कारकीर्द सुरु केलेले राजाभाऊ अनेक वेळेला चित्रपटाला
‘बॅकराऊंड म्युझिक’ देण्यासाठी हार्मोनियम वाजवायचे. तसेच ते पत्त्यांची जादू व सायकलींच्या कसरती करायचे असे
राजा परांजपे यांचे अनेक पैलू प्रभावळकर यांनी उलगडले. त्यांच्या नावाने पुरस्कार मिळाल्याने मला माझ्या पुढच्या
कारकिर्दीसाठी स्फूर्ती मिळाली आहे अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.
श्रीकांत मोघे म्हणाले, राजाभाऊंसारखा दुसरा दिग्दर्शक नाही. गायकांना जशी घराणी असतात तसे राजाभाऊंचे मास्टर
विनायकांचे घराणे होते. मराठी चित्रपटांना आता खूप चांगले दिवस आले आहेत असे सांगून ते म्हणाले, राजाभाऊंसारखी
अत्यंत प्रतिभावान व श्रीमंत माणसे त्याकाळात होती. मात्र, मराठी समाज जाणकार नव्हता. त्यांनी या माणसांना मोठे
बनवायला हवे होते.
भारत देसडला यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय जोशी यांनी केले.
आभार अजय राणे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या शेवटी लेखक व गीतकार प्रणीत कुलकर्णी यांनी दिलीप प्रभावळकर यांची मुलाखत घेतली. माझा माझ्यावर
आहे त्यापेक्षा अनेकदा दिग्दर्शकाचाच माझ्यावर जास्त विश्वास वाटतो.असे अनेक वेळेला झाले आहे व त्यातूनच आपण
विविध भूमिका साकारल्या अशी प्रांजळ कबुली प्रभावळकर यांनी या मुलाखतीमध्ये दिली.
माझी खरेतर नैसर्गिक अभिनय शैली वापरण्याची पद्धत आहे.परंतु ती शैली मी चिमणरावांची भूमिका करताना वापरली
नाही तर कार्टून प्रमाणे भूमिका केली असे त्यांनी सांगितले. चिमणरावांचा चेहरा, प्रतिमा, यामुळे मी लोकांपर्यंत
पोहोचलो. परंतु नंतर मला ते नकोसे झाले होते, कारण लोक ते विसरायला तयार नव्हते.मात्र नंतर मी त्यातून बाहेर
पडलो अशा जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. नातीगोती मधील भूमिका व गांधीजींची भूमिका ही मी तयारी
करून केली होती . काही भूमिका या करता करता तर काही पटकन केलेल्या भूमिका होत्या असे त्यांनी सांगितले. चौकट
राजाची आपली भूमिका ही उत्स्फूर्ततेने केलेली भूमिका होती असे त्यांनी आवर्जून नमूद केले.