सातारा (जिमाका) : खूप कमी वेळामध्ये अद्भूत आणि आश्चर्यकारक काम सातारा जिल्ह्यामध्ये झाले आहे. सर्वसामान्य शेतकरी आणि जनतेच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत शाश्वतपणे करण्यात आलेल्या कामासाठी जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांचे कष्ट कौतुकास्पद आहे, अशा शब्दात राजस्थानच्या मुख्यमंत्री श्रीमती वसुंधरा राजे यांनी श्री. मुद्गल यांचा गौरव केला आहे.
राज्य शासनाने हाती घेतलेले जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत सातारा जिल्ह्यात झालेल्या कामांची माहिती देण्यासाठी श्री. मुद्गल हे राजस्थानमधील जयपूर येथे गेले होते. यावेळी त्यांनी तासाभाराच्या संगणकीय सादरीकरणात जिल्ह्यामध्ये झालेल्या पाझर तलाव मोहिम, गाळ काढणे, लोकसभाग, प्रशासनामार्फत इंधन पुरवठा, गूळंब चांदक ओढाजोड प्रकल्प, जाखणगाव पॅटर्न, रानमळा, माण खटाव तालुक्यात झालेली कामे, प्रसारमाध्यमांनी घेतेली दत्तक योजना, विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सहभाग आदीबाबत विस्तृतपणे माहिती सादर केली. हे करता असताना सातारा जिल्ह्याचे प्राकृतिक, भौगोलिक रचना सांगून जिल्ह्याची गरज लक्षात घेऊन करण्यात आलेले वॉटर बजेट आणि कामांचे नियोजन याचा प्रामुख्याने समावेश होता. जलसंधारणाच्या कामांमध्ये सातारा छत्रपती शिवाजी महाराजांची पवित्र भूमी असल्याचे आर्वजून त्यांनी मराठीतून उल्लेख केला. त्याचबरोबर साताऱ्याचे ऐतिहासिक महत्व आणि शिवकालिन पाणी पुरवठ्याबाबतही अभिामानाने माहिती सांगितली आणि सातारा जिल्हा भेटीचे उपस्थितांना आग्रहाचे निमंत्रण दिले.
जिल्हाधिकारी श्री. मुद्गल यांनी केलेल्या सादरीकरणानंतर भारावून राजस्थानचे मुख्य सचिव सी.एस. राजन यांनी राजस्थानची प्राकृतिक माहिती सांगितली. ते म्हणाले, राजस्थानच्या 2/3 भाग वाटवंट आहे आणि येथील पर्जन्यमान 400 मिलीमिटर पेक्षा कमी आहे. यासाठी उपययोजनांबाबत सविस्तर चर्चा केली. यावर श्री. मुद्गल यांनी स्थानिक रहिवाशी त्यामध्ये असणारे ज्येष्ठ नागरीक यांच्याकडून पाण्याची परिस्थिती का खालवत चालली याबाबतची माहिती गोळा करण्याविषयी सुचविले.
जलसंधारण सचिव प्रभाकर देशमुख यांनी सुरुवातीलाच महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीकोनातून जलयुक्त शिवार अभियान का राबविण्यात येत आहे. त्याचे फायदे त्याबरोबर कसे राबविण्यात आले याची विस्तृत माहिती दिली.
मुख्यमंत्री श्रीमती वसुंधरा राजे यावेळी म्हणाल्या, महाराष्ट्राच्या धर्तीवर राजस्थानमध्येही जिल्हाधिकारी केंद्रभूत करुन अशा पद्धतीने अभियान राबवावे आणि या अभियानामध्ये अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी जोखून देऊन काम करावे. महाराष्ट्रातील जिल्हाधिकाऱ्यांना विशेष धन्यवाद देते. अत्यंत चांगल्या पद्धतीने कमी वेळेत दर्जेदार काम करुन त्याचे सादरीकरणही प्रभाविणे तितकेच दर्जेदारपणे केले आहे. माझे गाव सातारमधीलच आहे. सातारा जिल्ह्याविषयी मला चांगली माहिती आहे. सातारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात कष्ट करुन आश्चर्यकारक बदल घडवून आणला आहे. त्यांचे हे काम निश्चितपणे प्रेरणा देणारे आहे आणि कौतुकास्पद आहे, अश शब्दात जिल्हाधिकारी श्री. मुद्गल यांच्या कार्याचा गौरव केला.