पुणे, दि. 06 : महावितरणच्या त्रिसुत्री एकदिवसीय कार्यक्रमात राजगुरुनगर विभागातील दोन ग्रामपंचायतींमध्ये वीजयंत्रणेच्या दुरुस्ती व वीजसेवेची विविध 572 कामे गुरुवारी (दि. 3) पूर्ण करण्यात आली. यात ‘महावितरण आपल्या दारी’मध्ये 80 ठिकाणी नवीन वीजजोडणी देण्यात आली.
वाडा (राजगुरुनगर) व सदुंबरे (तळेगाव) या ग्रामपंचायतींमध्ये त्रिसुत्री एकदिवसीय कार्यक्रम राबविण्यात आला. विशेष म्हणजे यातील सदुंबरे (ता. मावळ) हे केंद्ग सरकारच्या संसद आदर्श ग्राम योजनेतील गाव आहे. सदुंबरे येथील पाणीपुरवठा योजनेला योग्य दाबाने वीजपुरवठा व्हावा यासाठी 100 केव्हीए क्षमतेच्या रोहित्राची क्षमता दुप्पट करून ती 200 केव्हीए करण्यात आली. या त्रिसुत्री कार्यक्रमातून पाणीपुरवठा योजनेच्या कमी दाबाच्या वीजपुरवठ्याचा प्रश्न निकाली निघाला आहे.
सदुंबरे व वाडा या या दोन्ही ग्रामपंचायतीमध्ये 119 ठिकाणी वीजयंत्रणेची विविध दुरुस्ती कामे करण्यात आली. यात वाकलेले वीजखांब सरळ करणे, डिस्ट्रीब्यूशन बॉक्स व किटकॅट बदलणे, रोहित्र देखभाल, नवीन वीजखांब, तारांमधील झोल काढणे, वीजखांबाला रंगकाम, स्पेसर्स बसविणे, झाडाच्या फांद्या तोडणे आदी कामांचा समावेश आहे. वीजसेवेमध्ये वीजदेयकांची दुरुस्ती, रिडींग घेणे, मीटर बदलणे आदी 373 कामे करण्यात आली तर 80 ठिकाणी नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे.
मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे, अधीक्षक अभियंता श्री. सुनील पावडे यांनी सदुंबरे ग्रामपंचायतीला भेट देऊन तेथील त्रिसुत्री कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची पाहणी केली. सदुंबरे ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात महावितरणच्या ‘त्रिसुत्री’ कार्यक्रमाबाबत माहिती देण्यात आली. यावेळी सरपंच सौ. संगिता भांगे, तालुका वीज समन्वयक समितीचे सदस्य श्री. नितीन गाडे उपस्थित होते. एकाच दिवसात वीजयंत्रणेची दुरुस्ती, वीजसेवेविषयक तक्रारींचा गावातच निपटारा व नवीन वीजजोडणीची प्रक्रिया झाल्याने ग्रामस्थांनी त्रिसुत्री कार्यक्रमाचे स्वागत करून समाधान व्यक्त केले. राजगुरुनगर विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. मनीष ठाकरे यांच्यासह 67 अभियंते व कर्मचारी त्रिसुत्री अभियानात सहभागी झाले होते.

